विजयासाठी उमेदवारांनी जागविली रात्र

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

सोमवारचा दिवस होता "मॅनेजमेंट'चा; कार्यकर्त्यांकडून घेतला अखेरचा आढावा

सोमवारचा दिवस होता "मॅनेजमेंट'चा; कार्यकर्त्यांकडून घेतला अखेरचा आढावा
पुणे - राजकीय पक्षांनी करून घेतलेले सर्वेक्षणाचे अहवाल, त्यातील आकडेवारीची दखल घेत आपण कोठे कमी-जास्त पडत आहोत, याचा आढावा घेत विविध नेत्यांनी सोमवारचा दिवस "मॅनेजमेंट'मध्ये घालवला. सत्तेच्या चाव्या आपल्याच हातात राहव्यात, यासाठी सर्वच राजकीय पक्षांची आणि नेत्यांची त्यासाठी धावपळ सुरू होती. मात्र, पुणेकर या चाव्या कोणाकडे देणार, हे "इलेट्रॉनिक व्होटिंग मशिन'मध्ये (ईव्हीएम) मंगळवारी बंदिस्त होणार आहे.

महापालिका निवडणुकीसाठी गेल्या पंधरा दिवसांत सर्वच राजकीय पक्षांच्या जोरदार प्रचारामुळे शहर ढवळून निघाले होते. या प्रचाराच्या जोरावर प्रत्येक राजकीय पक्षाने महापालिकेत बहुमताचे दावेही केले. त्यातून उलटसुलट अंदाज व्यक्त झाले. त्या आधारावर शेवटच्या काही तासांत व्यूहरचना करण्यात आली. त्यासाठी रात्री उशिरापर्यंत शहराच्या सर्वच भागांत भेटीगाठी आणि चर्चा सुरू होत्या. आपले पॉकेट फिक्‍स झाले का, निरोप पोचले का सगळ्यांना, ...इकडे आपला जोर कमी पडतोय, त्या सोसायट्या पॅक झाल्या का, मंडळांशी बोलणं झालेय, यादीनुसार मतदान करून घ्यायचे आहे, तयारी झाली आहे ना सगळी, त्यांना समजावून सांगितले आहे ना, असे आणि अशा पद्धतीचे अनेक संवाद उमेदवार, नेत्यांभोवती, तसेच कार्यकर्त्यांमध्ये सुरू होते. सायंकाळनंतर घडामोडींना वेग येत गेला अन्‌ मतदानापूर्वीची रात्र जागी होत गेली.

महापालिका निवडणुकीसाठी मतदान मंगळवारी सकाळी साडेसातला सुरू होणार आहे. निवडणुकीसाठीचा प्रचार रविवारी सायंकाळी साडेपाच वाजला संपला खरा; पण त्यानंतरही उमेदवारांनी भेटीगाठी आणि संपर्कावर भर दिला. चार सदस्य पद्धतीने यंदा निवडणूक होत असल्यामुळे प्रभागाचा वाढलेला भौगोलिक विस्तार आणि मोठ्या संख्येचे मतदार, यांचे आव्हान पेलण्यासाठी उमेदवारांची अंतिम तयारी आणि आनुषंगिक घडामोडींचा वेग वाढला होता.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, शहराध्यक्ष वंदना चव्हाण, भाजपचे नेते पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे तसेच पक्षाचे आठही आमदार, कॉंग्रेसचे नेते विश्‍वजित कदम, शहराध्यक्ष रमेश बागवे, हर्षवर्धन पाटील, सर्व माजी आमदार आणि पदाधिकारी, शिवसेनेचे संपर्कप्रमुख अमोल कोल्हे, शहर प्रमुख विनायक निम्हण, माजी आमदार व पदाधिकारी, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, शहरप्रमुख हेमंत संभूस, अजय शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी संपर्क मोहिमांमध्ये व्यग्र होते. हमखास विजयी होण्याची शक्‍यता असलेल्या उमेदवारांना खबरदारी बाळगण्यासाठी सांगतानाच शेवटच्या टप्प्यात त्यांना "रसद' पुरविण्यावर भर दिला जात होता. त्याच वेळी दगाफटका होऊ नये यासाठी नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांना राजी करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी भर दिला होता.
उमेदवारही त्यांच्या प्रभागातील सोसायट्या, वस्त्यांमधून जास्तीत जास्त मतदान कसे करून घेण्याचे नियोजन करत होते. त्यासाठी जबाबदारी दिलेल्या कार्यकत्यांना "साधनसामग्री'ची आणि "रसद' कमी पडणार नाही, याची काळजी घेतली जात होती. बहुसंख्य उमेदवारांनी कार्यकर्त्यांची पोटपूजेची व्यवस्था केली होती. वस्ती आणि झोपडपट्टीत शेवटपर्यंत मतदान करण्यासाठी वाट पाहणाऱ्यांची यादी तयार करून त्यांनी वेळेत मतदान करावे, यासाठी कार्यकर्ते रात्री उशिरापर्यंत प्रयत्नशील होते. मतदारांना मतदानासाठी वाहनांचीही "मॅनेजमेंट' केली जात होती. जास्तीत जास्त अनुकूल मतदान व्हावे, यासाठी उमेदवार सर्व प्रकारचे प्रयत्न करत असल्याचे सार्वत्रिक चित्र होते.

क्रॉस व्होटिंगची भीती?
प्रभागातील प्रत्येक पक्षाच्या चारही उमेदवारांनी एकत्रितच नियोजन करावे, असे स्पष्ट आदेश भाजपने, तर आघाडी असलेल्या प्रभागांत कॉंग्रेसच्या उमेदवारांसह मतदारांशी संपर्क करावा, असे राष्ट्रवादीने उमेदवारांना सांगितले होते. शिवसेनेही अशाच पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्यक्षात काही ठिकाणी उमेदवारांनी स्थानिक परिस्थितीनुसारही परस्पर "टाय-अप' केल्याची चर्चा होती. "आम्ही तुम्हाला, तर तुम्ही आम्हाला चालवा' अशा पद्धतीने उमेदवार-कार्यकर्त्यांचे अखेरचे डाव ठरत होते; तर काही ठिकाणी सोसासट्या, समाजघटक, मंडळांनी दोन-दोन, तीन-एकचा फॉर्म्युला तयार करून आपला शब्द मानणाऱ्या मतदारांना त्याची माहिती देण्यास प्रारंभ केला होता.

चार बटणे दाबाच
इलेट्रॉनिक व्होटिंग मशिनवर (एव्हीएम) चार गटांसाठीची बटणे दाबल्याशिवाय मतदान पूर्ण होणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. एखाद्या गटात कोणत्याच उमेदवाराला मतदाराला मत द्यायचे नसल्यास, तर त्याने त्या गटातील "नोटा'चे बटण दाबणे अपेक्षित आहे, असेही त्यांनी सांगितले. मात्र, या नियमाचा "राजकीय फायद्याचा' अर्थ काढून काही कार्यकर्ते भलतेच निरोप मतदारांपर्यंत पोचवीत असल्याचेही चित्र काही ठिकाणी होते.

Web Title: Night victory candidates stay awake