पीएमपीची नऊ पास केंद्रे कमी उत्पन्नामुळे बंद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

पुणे - कमी उत्पन्न असलेली शहर व पिंपरी-चिंचवडमधील नऊ पास केंद्रे बंद करण्याचा आदेश पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी सोमवारी दिला. दरम्यान, स्वारगेट डेपो मॅनेजर आणि आगार अभियंत्यांनाही कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. 

पीएमपीमध्ये वाहक-चालकांची संख्या कमी आहे. त्यातच काही पास केंद्रांवर दर दिवसाला दोन हजार रुपयेही उत्पन्न नव्हते. वाहक मार्गावर गेला, तर किमान 10-12 हजार रुपये उत्पन्न पीएमपीच्या तिजोरीत जमा होते. हे लक्षात घेऊन देहूगाव, संभाजीनगर (चिंचवड), सांगवी, बोपोडी, पाषाण, लोअर इंदिरानगर, गालिंदे पथ, वानवडी आणि मगरपट्टा येथील पास केंद्रे बंद करण्यात आली आहेत. या पास केंद्रांऐवजी मुकाई चौक (किवळे), निगडी, पिंपळे गुरव-औंध, खडकी बाजार, मनपा बस स्थानक, अपर इंदिरानगर, कोथरूड स्टॅंड, कोंढवा-महात्मा गांधी स्टॅंड, हडपसर (गाडीतळ) येथून पास मिळू शकतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले. 

दोन अधिकाऱ्यांना नोटिसा 

मुंढे यांनी स्वारगेट कार्यशाळा आणि प्रशासकीय इमारतीस सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास भेट दिली. त्या वेळी अनेक कामगार गणवेशाशिवाय दिसले. काही जण नेमून दिलेल्या जागेवर काम करत नव्हते, तर काही जण गप्पा मारताना दिसले. स्टोअरमध्येही त्यांनी भेट दिली. पीएमपीच्या नियमांचे आगारात उल्लंघन होत असल्यामुळे त्यांनी स्वारगेटचे आगार व्यवस्थापक, आगार अभियंता यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

Web Title: Nine centers have low incomes close to PMP