पुणे-मुंबई महामार्गावर नऊ उड्डाण पूल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक विनाअडथळा करण्यासाठी निगडी आणि देहूरोड येथील उड्‌डाण पूल पूर्णत्वास येत असून सोमाटणे ते कार्ला फाटा दरम्यान नऊ नवीन छोटे उड्‌डाण पूल उभारण्याचा आराखडा रस्ते विकास महामंडळाने तयार केला आहे. पुलांचे काम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक जलद होणार असून, वाहनचालकांच्या वेळेची बचत होणार आहे.

पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक विनाअडथळा करण्यासाठी निगडी आणि देहूरोड येथील उड्‌डाण पूल पूर्णत्वास येत असून सोमाटणे ते कार्ला फाटा दरम्यान नऊ नवीन छोटे उड्‌डाण पूल उभारण्याचा आराखडा रस्ते विकास महामंडळाने तयार केला आहे. पुलांचे काम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक जलद होणार असून, वाहनचालकांच्या वेळेची बचत होणार आहे.

सद्यःस्थिती
दापोडी ते निगडीदरम्यान ग्रेडसेपरटरची सुविधा असल्याने वाहतूक जलद होत आहे. निगडी परिसरात उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. भक्‍ती-शक्‍ती चौक ते देहूरोडपर्यंतच्या रस्त्यांचे रुंदीकरण झाले आहे. देहूरोड येथे उभारलेला उड्‌डाण पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे सध्या गावातून होणारी वाहतूक सुरळीत होणार आहे.
सोमाटणे फाटा परिसरात एक रस्ता द्रुतगती महामार्गाकडे जातो. या चौकालगत रिक्षा, अन्य वाहने थांबलेली असतात. त्यामुळे येथे कायम वाहनांची गर्दी असते. जुन्या महामार्गावर तळेगाव, वडगाव, देहूरोड, कान्हे फाटा, कार्ला फाटा या भागात बऱ्याचदा वाहतुकीचा खोळंबा होतो.

जंक्‍शनच्या ठिकाणी उड्‌डाण पूल
रस्ते विकास महामंडळाने सोमाटणे फाट्यापासून ते कार्ला फाटा दरम्यानच्या मार्गावर नऊ ठिकाणी जंक्‍शन आहेत. त्यात कार्ला फाटा, कान्हे फाटा, वडगाव फाटा परिसरात (दोन), देहूरोड वाय जंक्‍शन, वडगाव वाय जंक्‍शन, तळेगाव एमआयडीसी, तळेगाव-चाकण रोड, सोमाटणे फाटा येथे उड्‌डाण पूल बांधण्याचे प्रस्तावित आहे. हे पूल 400 ते 500 मीटर लांबीचे असणार आहेत. त्यासाठी 30 ते 40 कोटी रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे.

पुणे-मुंबई महामार्गावर सोमाटणे फाटा ते कार्ला फाटा दरम्यानच्या रस्त्यावर जंक्‍शनच्या ठिकाणी उड्‌डाण पूल उभारण्याचे प्रस्तावित आहे. सध्या त्याची पडताळणी सुरू आहे. उड्‌डाण पूल झाल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक जलद होईल.
- प्रशांत औटी, अधीक्षक अभियंता, रस्ते विकास महामंडळ

रोज कामानिमित्त जुन्या महामार्गाने स्वतःच्या वाहनाने लोणावळ्यापर्यंत जातो. या मार्गावर अनेक ठिकाणी गावे आहेत. त्यामुळे बऱ्याचदा मुख्य रस्त्यावर वाहनांची कोंडी होते. या रस्त्यावर उड्‌डाण पूल उभारण्याचे काम लवकर पूर्ण झाल्यास नोकरी, व्यवसायानिमित्त रोज लोणावळ्यापर्यंत ये-जा करणाऱ्यांच्या वेळेची बचत होईल.
- दिनेश मराठे, वाकड

- सोमाटणे-कार्ला फाटा दरम्यान प्रस्ताव
- रस्ते विकास महामंडळाचा आराखडा तयार
- वाहतूक सुरळीत होण्यास मदत

Web Title: Nine Flyover on Pune Mumbai Highway