लोणीतील इंधन माफिया पुन्हा सक्रिय ; नऊ हजार लिटर इंधनावर डल्ला

44crime_logo_525_1.jpg
44crime_logo_525_1.jpg

लोणी काळभोर : गाडीत पेट्रोल, डिझेल भरताना पेट्रोल पंपावर कामगाराने "पॉइंट' मारला ही तक्रार कायमच ऐकायला मिळते. मात्र, लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एका तेल माफियाने बाणेर (पुणे) परिसरातील एका पंपचालकाला पॉईंटमध्ये नव्हे; तर बारा हजार लिटरपैकी चक्क नऊ हजार लिटर डिझेलचा काटा मारल्याची घटना उघडकीस आली आहे. या इंधन माफियाने बारा हजार लिटर क्षमतेच्या टँकरमधून सहा हजार लिटर डिझेलवर डल्ला मारला; तर त्याच्या चालकाने चोरावर मोर होत उर्वरित सहा हजार लिटरपैकी तीन हजार लिटर डिझेलचा काटा मारला. पंपावर टँकर वेळेपूर्वीच खाली झाल्याने पंप चालकाच्या लक्षात ही चोरी आली. 

बाणेर परिसरातील एका सरकारी कंपनीच्या पेट्रोल पंपावर चार दिवसांपूर्वी वरील प्रकार घडला. तेल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या चोरीतील आपला व संबंधित तेल माफियाचा सहभाग लपविण्यासाठी टँकर चालकाला पंपावर देण्यासाठी कंपनीकडून देण्यात आलेले चलन बदलून दिल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणामुळे लोणी काळभोर येथील तीनही तेल कंपन्यांच्या डेपोमधून बाहेर पडणाऱ्या टँकरमधील पेट्रोल- डिझेलवर मास्टर की वापरून डल्ला मारणारे स्थानिक इंधन माफिया पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे. 

तेल कंपनीच्या गोपनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथील एका तेल माफियाच्या नावे येथील एका तेल कंपनीत डिझेल व पेट्रोल वाहतुकीचे कंत्राट आहे. त्याच्या जवळच्या नातेवाइकाच्या नावावर पेट्रोल पंपही आहे. बाणेर परिसरातील सरकारी कंपनीच्या पेट्रोल पंपावर खाली करण्यासाठी संबंधित कंपनीच्या डेपोमधून चार दिवसांपूर्वी बारा हजार लिटर क्षमतेचा डिझेल टँकर बाहेर पडला होता. टँकर बाहेर पडताच संबंधित इंधन माफियाने टँकर स्वतःच्या पंपावर नेऊन टँकरमधील सहा हजार लिटर डिझेल पंपात उतरवून घेतले व चालकाला बाणेरला टँकर घेऊन जाण्यास सांगितले. मात्र, टँकर चालकाने कदमवाकवस्ती हद्दीतील एका इमारतीजवळ टँकर उभा करून त्यातील तीन हजार लिटर डिझेल काढून एकाला विकले. बाणेर येथे टँकरमध्ये डीप न मोजता टँकर खाली करण्यास संबंधित व्यवस्थापकाने परवानगी दिली. मात्र, अर्धा तासाच्या आतच टँकरमधील बारा हजार लिटर डिझेल खाली झाल्याचे व्यवस्थापकाला समजताच त्याचे डोके चक्रावून गेले. यावर व्यवस्थापकाने पंपाच्या डिझेल साठवणुकीच्या टाकीत डीप टाकून तपासणी केली असता टँकरमधून बारा हजार लिटरऐवजी फक्त तीनच हजार लिटर डिझेल खाली झाल्याची बाब उघडकीस आली. 

 

दरम्यान, पंप व्यवस्थापकाने घडलेली बाब तातडीने या पेट्रोलियम कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घातली. यावर अधिकाऱ्यांनी संबंधित माफियाला बोलावून घडलेल्या घटनेची माहिती दिली. तसेच, हे प्रकरण बाहेरच्या बाहेर मिटवण्याची विनंतीही केली. यावर संबंधित माफियाने टँकर आपल्याच पंपात खाली झाल्याचे दाखविल्यास ही चोरी पचू शकते, असे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर या पेट्रोलियम कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने वेळ न दवडता बाणेर परिसरातील संबंधित पंपाच्या नावाचे चलन बदलून माफियाच्या पंपाच्या नावाने दिले. तसेच, बाणेर येथील पंपाच्या व्यवस्थापकाला फोन करून प्रकरण न वाढवण्याची विनंती केली. पंप व्यवस्थापकालाही फुकटचे तीन हजार लिटर डिझेल मिळाल्याने हे प्रकरण दडपले गेले. 


. . . . . . 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com