नीरा-भीमा नदीजोड प्रकल्प प्रगतिपथावर

Bogada
Bogada

वालचंदनगर (पुणे) : मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या महत्त्वाकांक्षी नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. इंदापूर तालुक्‍यामध्ये सहा ठिकाणी वेगाने काम सुरू असून आत्तापर्यंत 9.6 किलोमीटर लांबीमध्ये बोगद्याचे काम पूर्ण झाले असून येणाऱ्या तीन वर्षांमध्ये संपूर्ण प्रकल्प पूर्ण होईल.

नीरा नदीमधून पावसाळ्यात वाहून जाणारे सात टीएमसी पाणी भीमा नदीमध्ये सोडण्यात येणार आहे. भीमा नदीतून जेऊरच्या बोगद्याच्या माध्यमातून सीना-कोळेगाव प्रकल्पामध्ये हे पाणी सोडण्यात येणार आहे. या प्रकल्पामधून उपसासिंचन योजनेच्या माध्यमातून मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यासाठी या पाण्याचा उपयोग होणार आहे.

यासाठी इंदापूर तालुक्‍यामध्ये जमिनीपासून 40 ते 83 मीटर खालून बोगदा खोदण्याचे काम सुरू आहे. सुमारे 22.24 किलोमीटर लांबीचा व 8 मीटर उंची व 8.25 रुंदीचा बोगदा खोदण्याचे काम सुरू आहे. बारामती तालुक्‍यातील सोनगावमधून बोगद्याला सुरवात होणार असून तावशी-सपकळवाडी-सणसर-शिंदेवाडी-अकोले मार्ग भादलवाडीपर्यंत बोगदा जाणार आहे. भादलवाडीमध्ये उजनी जलाशयामध्ये सोडण्यात येणार आहे.

बोगद्याच्या सुरवातीला व शेवटी दोन्ही बाजूला 600 मीटर लांबीचा उघडा कालवा असणार आहे. मार्च 2017 पासून बोगद्याचे काम वेगाने सुरू आहे. आत्तापर्यंत 9.6 किलोमीटर लांबीमध्ये बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. सध्या सहा ठिकाणी जमिनीमध्ये मोठ्या विहिरीसारखी खोदाई केली असून दोन्ही बाजूने बोगदा खोदण्याचे काम सुरू आहे. एका दिवसामध्ये एका बाजूने सुमारे अडीच मीटर काम होत आहे. सहा ठिकाणी 500 मजूर 25 मीटर काम करीत आहेत.

अकोल्यामध्ये नुकतेच दोन बोगदे एकमेकांना जोडण्यात आले. येणाऱ्या तीन वर्षांमध्ये संपूर्ण बोगद्याचे काम पूर्ण होईल. बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पावसाळ्यामध्ये 43 दिवसामध्ये 1872 क्‍यूसेक विर्सगाने बोगद्यातून 7 टीएमसी पाणी नीरा नदीमधून भीमा नदीमध्ये जाणार आहे. दरवर्षी सरासरी 25 टीएमसी पाणी नीरा नदीमधून वाहून जात असते. यातील सात टीएमसी पाण्याचा उपयोग मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होणार आहे

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

  • प्रकल्पाची एकूण लांबी - 23.80 किलोमीटर
  • बोगद्याची लांबी- 22.24 किलोमीटर
  • बोगद्याची उंची- 8 मीटर
  • बोगद्याची रुंदी- 8.25 मीटर
  • बोगद्याचे पूर्ण काम- 9.60
  • काम पूर्ण झाल्यानंतर 43 दिवसांमध्ये 1872 विर्सगाने 7 टीएमसी पाणी नीरा नदीमधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com