इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना नीरा डाव्या कालव्याचे हक्काचे पाणी मिळेना

राजकुमार थोरात
सोमवार, 30 एप्रिल 2018

कालव्याचे पाणी सायफनसाठी ?
धरणातुन नीरा डाव्या कालव्याला तीन टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. निमगाव उपविभागातील अनेक शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी मिळाले नाही.तसेच पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांना पाणी दिले नाही. नीरा डाव्या कालव्यातुन सायफनद्वारे बेसुमार पाणी चोरी होत आहे. कालव्यातुन धनदांडगे मोठे शेतकरी पैशाच्या जोरावर कालव्याचे पाणी चोरी करीत असल्यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळत नसल्याचे चित्र पहावयास मिळत असुन इंदापूरचे कालव्याचे पाणी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यामध्ये नीरा डाव्या कालव्याचे उन्हाळी हंगामातील पाण्याचे नियोजन फसल्यामुळे शेतकऱ्यांची पिके जळू लागली आहेत.पाण्यासाठी शेतकरी आत्महत्या करु  लागले असून कालव्याचे तीन टीएमसी पाणी गेले कुठे ? असा  प्रश्‍न शेतकरी विचारु लागले असून पाण्याचे नियोजनास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी  शेतकऱ्यामधून होत आहेत.

चालू वर्षी नीरा खोऱ्यातील धरणक्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे धरणे शंभर टक्के भरली होती. १२ मार्च रोजी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये  इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी उन्हाळी हंगामासाठी दोन आवर्तन देण्याचा निर्णय झाला.दोन्ही आवर्तनासाठी प्रत्येक चार टीएमसी पाणी देण्यात येणार होते. १३ मार्च रोजी धरणातुन पाणी सोडण्यात आले.मात्र कालवा फुटल्यामुळे पाणी बंद करुन पुन्हा सोडले. २३ मार्च रोजी निमगाव केतकी परीसरातील ५९ क्रंमाकाच्या वितरिकेमधून पाण्याच्या सिंचनाला सुरवात झाली.३७ दिवस झाले तरीही निमगाव उपविभागातील शेतकऱ्यांचे सिंचन सुरु आहे. या परीसरात पाणी चोरी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे परीसरातील रेडणी,रेडा,निरवांगी, पिटकेश्‍वर ,सराफवाडी परीसरातील शेतकऱ्यांना  पाणी न मिळातच पोट वितरिकेचे पाणी बंद झाले आहे. या परीसरातील शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी आज रविवार(ता.२९)रोजी आमदार दत्तात्रेय भरणे यांची भेट घेवून पाणी देण्याची मागणी केली. निमगाव उपविभागाला ३७ दिवस पाणी देवून ही सिंचन होत नसल्यामुळे पाटबंधारे विभागाच्या कार्यपद्धतीवर शंका व्यक्त होत आहे.  गेल्या दोन वर्षापासुन पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामातील पाणी मिळण्यास विलंब होत असल्याने बेलवाडी येथील अर्बन बॅंकेचे संचालक वसंत पवार यांनी आत्महत्या केली होती. इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील ४३ क्रंमाकाची  वितरिकेला पाणी सोडण्यात आले अाहे. लासुर्णे,बेलवाडी,कळंब,कुरवली परीसरातील शेतकऱ्यांवर प्रत्येक वर्षी अन्याय होत असून पाणी उशीरा मिळाल्यामुळे पिके जळत आहे.

कालव्याचे पाणी सायफनसाठी ?
धरणातुन नीरा डाव्या कालव्याला तीन टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. निमगाव उपविभागातील अनेक शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी मिळाले नाही.तसेच पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांना पाणी दिले नाही. नीरा डाव्या कालव्यातुन सायफनद्वारे बेसुमार पाणी चोरी होत आहे. कालव्यातुन धनदांडगे मोठे शेतकरी पैशाच्या जोरावर कालव्याचे पाणी चोरी करीत असल्यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळत नसल्याचे चित्र पहावयास मिळत असुन इंदापूरचे कालव्याचे पाणी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

Web Title: Nira canal water in Indapur