नीरा डाव्या कालव्यातून रब्बीसाठी दुसरे आवर्तन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

वालचंदनगर - नीरा डाव्या कालव्यावरील रब्बीच्या हंगामातील दुसऱ्या आवर्तनासाठी  शेतकऱ्यांना ३ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार असून, शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून पाण्याची बचत करावी. बचत करणाऱ्या वितरिकेवरील शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामातील बचत केलेले पाणी वाढवून देणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांनी दिली.

वालचंदनगर - नीरा डाव्या कालव्यावरील रब्बीच्या हंगामातील दुसऱ्या आवर्तनासाठी  शेतकऱ्यांना ३ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार असून, शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून पाण्याची बचत करावी. बचत करणाऱ्या वितरिकेवरील शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामातील बचत केलेले पाणी वाढवून देणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांनी दिली.

शेतीसाठीचे रब्बीचे दुसरे आवर्तन डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुरू होणार आहे. आगामी काळातील दुष्काळी परिस्थिती पाहता पाटबंधारे विभागाने पाणी चोरी, पाणी गळतीवर लक्ष केंद्रित केले आहे. नीरा डाव्या कालव्यातील सायफन काढण्याची व कालवा स्वच्छतेची मोहीम सुरू आहे. रब्बीतील हंगामासाठी ३ टीएमसी पाणी देण्यात येणार आहे. यामध्ये इंदापूर व बारामती तालुक्‍यांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे. हे पाणी देताना प्रत्येक वितरिकेला ठराविक कोटा मंजूर करण्यात येणार असून, कोट्याप्रमाणाचे पाण्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्या वितरिकेवरील शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून पाण्याची बचत केल्यास त्याच वितरिकेवरील शेतकऱ्यांना बचत केलेले पाणी उन्हाळी हंगामातील आवर्तनाच्या वेळी वाढवून देण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. 

ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी तलावामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पाणी सोडण्यात येणार आहे. तलावामध्ये पाणी सोडल्यानंतर तलावातील व शेजारील विहिरीमधील पाणीउपसा नागरिकांनी करू नये, असे आवाहन धोडपकर यांनी केले आहे.

शेटफळ तलावासाठी पाणी...
नीरा डाव्या कालव्यातील सायफन काढण्याची व स्वच्छता करण्याची मोहीम अंतिम टप्प्यात असून, येत्या दोन-तीन दिवसांमध्ये शेटफळ तलावासाठी पाणी सोडण्यास सुरवात करण्यात येणार आहे. तलावामध्ये २०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे. यातील ५० दशलक्ष घनफूट पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या तलावावर अवलंबून असलेल्या शेटफळ, वडापुरी, पंधारवाडी, काटी, मोहितेमळा, रेडा, भोडणी, लाखेवाडी, वकीलवस्ती, नीरा भीमा सहकारी साखर कारखाना, खंडोबावाडी या अकरा पाणीपुरवठ्याच्या योजनांना पाणी उपलब्ध होणार आहे. शेटफळ तलावातील पाणी सोडल्यानंतर रब्बीच्या दुसऱ्या आवर्तनास सुरवात होणार असून, टेल टू हेड पद्धतीने पाणी देण्यात येणार आहे.

Web Title: Nira Left Canal Rabbi Season Water