'निरंजन'तर्फे 450 दिंड्यांना प्रथमोपचार पेट्या भेट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जून 2016

पुणे : विठुरायाच्या दर्शनाला आळंदीहून पंढरपूरला जाणाऱ्या 450 दिंड्यांना पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्थेने प्रथमोपचार पेट्या भेट दिल्या. या वेळी ‘निरंजन‘च्या कार्यकर्त्यांनी पंढरपूरची वारी सर्वांसाठी आरोग्यदायी जावो, असे साकडे माउलीचरणी घातले. 

पुणे : विठुरायाच्या दर्शनाला आळंदीहून पंढरपूरला जाणाऱ्या 450 दिंड्यांना पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्थेने प्रथमोपचार पेट्या भेट दिल्या. या वेळी ‘निरंजन‘च्या कार्यकर्त्यांनी पंढरपूरची वारी सर्वांसाठी आरोग्यदायी जावो, असे साकडे माउलीचरणी घातले. 

माउली पालखी सोहळ्याचे नियोजन करणाऱ्या चोपदार फाउंडेशनचे अध्यक्ष रामभाऊ चोपदार आणि कार्याध्यक्ष राजाभाऊ चोपदार यांच्याकडे या प्रथमोपचार पेट्या सुपूर्त करण्यात आल्या. या वेळी पुणे महापालिका सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक, संस्थेचे विराज तावरे, नवनीत मानधनी, नीलेश सोनिगरा, योगेश मुंदडा, धीरज धूत, संतोष कासट, अनुप गुजर, रमेश तोष्णीवाल, विशाल सारडा, जयेश कासट, वैशाली कासट, सपना सोनिगरा, अर्चना कासट, सुचिता तोष्णीवाल आदी उपस्थित होते. यापूर्वी पुण्यात या प्रथमोपचार पेट्यांचे महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते पूजन झाले.
राजाभाऊ चोपदार म्हणाले, "वारी पारंपरिक पद्धतीने सुरू असली, तरी त्यामध्ये काळानुरूप बदल करणे आवश्‍यक आहे. चोपदार फाउंडेशनच्या माध्यमातून स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने उपक्रम राबविण्यात येत आहेत.‘‘ 

प्रशांत जगताप म्हणाले, "वारी आरोग्यदायी व्हावी याकरिता निरंजन संस्थेने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.‘‘
ज्ञानेश्‍वर मोळक म्हणाले, "प्रत्येक वारकऱ्यासाठी ही वारी आरोग्यदायी जावी, याकरिता प्रशासन आणि सामाजिक संस्था प्रयत्नशील आहे.‘‘ विराज तावरे यांनी सूत्रसंचालन केले, तर जयेश कासट यांनी आभार मानले.

Web Title: niranjan sevabhavi social work