पुण्यातील नऊ वर्षांच्या चिमुरड्याचं गाणं होतंय लोकप्रिय...

पुण्यातील नऊ वर्षांच्या चिमुरड्याचं गाणं होतंय लोकप्रिय...

पौड : कोरोनामुळे शाळा बंद आहेत. घरात पालक वैतागलेले असले तरी मुलांना मात्र शाळेची ओढ लागली आहे. घरात बसून व्यथित झालेल्या मुलांच्या अल्लड मनाची केविलवाणी कैफियत निषाद संजय गरूड या चिमुरड्याने "शाळेत माझ्या जाईन केव्हा ?" या गाण्यातून मांडली आहे. आईच्या काव्यसौंदर्यांतून गुंफलेलं आणि अवघ्या नऊ वर्षाच्या निषादने त्याच्याच लडीवाळ आवाजात संगीतबद्ध केलेले हे गाणं सध्या महाराष्ट्रात लोकप्रिय होत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सर्वात कमी वयाचा संगीतकार म्हणून संगीत विश्वात पदार्पण करणाऱ्या निषादने गरूड घराण्याच्या चौथ्या पिढीचा वारसा पुढे चालवला आहे. निषाद हा मूळचा लवळे (ता. मुळशी) येथील असून आईवडीलांसह धायरी येथे राहतो. त्याचे पंजोबा (कै.) मारूतीबुवा गरूड लवळे पंचक्रोशीत प्रसिद्ध पखवाज आणि तबलावादक होते. त्यांनी पंडित भीमसेन जोशी, हिराबाई बडोदेकर यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांसोबत साथसंगत केली होती.

दरम्यान, निषादचे आजोबा (कै.) चंद्रकांत गरुड हे देखील भजन गायक आणि तबला व पखवाज वादक होते. त्यांचा हा शास्त्रीय गायकीचा वारसा कठिण परिश्रमातही निषादचे वडील संजय यांनी जोपासला आहे. सवाई गंधर्व महोत्सवासारख्या अग्रगण्य शास्त्रीय संगीताच्या व्यासपीठावरून संपूर्ण भारतभर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीची छाप पंडीत संजय यांनी निर्माण केली आहे. त्यांच्याकडून निषादलाही शास्त्रीय संगीताचे बाळकडू मिळत आहे.

निषाद कात्रजच्या आर्यन वर्ल्ड स्कूलमध्ये इयत्ता चौथी शिकत आहे. तसेच वडीलांनी सुरू केलेल्या ब्रम्हनाद संगीत विद्यालयात सारेगमपचे सूर आळवतो. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीनुसार जन्मल्यापासूनच निषादला संगीताची आवड आहे. त्याचीही आवड आईवडीलांनी जोपासून त्याला लहानपणापासून तंत्रशुद्ध संगीताचे धडे द्यायला सुरूवात केली.

कोरोनामुळे गेली चार महिने शाळा बंद आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. परंतू शाळेतल्या गमती-जमती, मित्र सवंगडी, मैदानी खेळ, गुरुजनांचा प्रेमळ सहवास, यापासून दुरावलेली बालमने आता पुरती कंटाळून गेली आहेत. निषाद घरात टिव्ही किंवा मोबाईलवर गेम खेळण्याऐवजी हार्मोनियम वाजविण्यातच मग्न असतो. सलग चारपाच दिवस निषादची हार्मोनियमवर सहजपणे चाललेली एक गाण्याची धून आणि सूर त्याची आई रागिणी यांनी हेरली. त्यांनी त्याला शब्दबद्ध केले. त्यातूनच "शाळेत माझ्या जाईन मी केव्हा ?", हा गीताचा मुखडा तयार झाला. त्यानंतर मायलेकांच्या साथीने कोरोना काळात मनात दडपलेल्या बालमनाची भावना काव्यमय झाली.

निषादने आपल्या अल्लड आणि लडीवाळ आवाजात हे गीत गायले. नादब्रम्हचे संगीत शिक्षक महेश गोसावी यांनी या गीताचे संगीत संयोजन केले. तर अक्षता गौतमे यांनी त्याचे चित्रीकरण केले. चिमुरड्यांची होत असलेली कुचंबना आर्ततेने निषादने स्वतः संगीतबद्ध केलेल्या गाण्यातून व्यक्त केली आहे. संपूर्ण गाणे तयार झाल्यानंतर ते फेसबूक, व्हॉटसअपवर व्हायरल केले. या गाण्याने अवघ्या दोनच दिवसात संपूर्ण महाराष्ट्रभर बालविश्वात आपुलकीचे स्थान निर्माण केले.
 हे गाणे ऐकून अनेकांच्या डोळ्यात आसवे दाटली. निषादच्या या गाण्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आमच्या घराण्याला गायन वादनाचा गेली चार पिढ्यांचा वारसा आहे. निषादमध्येही तो जन्मापासूनच दिसून आला. इतक्या कमी वयात तो हार्मोनियमवर गुणगुणत प्रथम संगीताची धून तयार करतो. त्यातून एका नवीन गाण्याच्या जन्म होतो. त्याच्या शाळेत माझ्या जाईन मी केव्हा हे गाणंही असंच गुणगुणून, त्याची धून करून तयार झालेले आहे. संगीताच्या क्षेत्रात गरूड घराण्याचा वारसा तो पुढे चालवित असून मुळशी तालुक्याचे नाव त्याने उज्वल करावे हीच अपेक्षा आहे.-पंडीत संजय गरूड (निषादचे वडील) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com