
Pune News : गडकरींचा वायदा, एक मे ला चांदणी चौक उड्डाणपुलाचे उद्घाटन
पुणे : चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी येथे सुरु असलेल्या उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर असताना याचे उद्घाटन महाराष्ट्र दिनी एक मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये होईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
सातारा मुंबई महामार्ग, पाषाण, बावधन, मुळशी या सर्व भागातील वाहतूक चांदणी चौकात एकत्र येते, या ठिकाणी एकच पूल असल्याने मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे या ठिकाणी बहुमजली उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेऊन आॅगस्ट २०१७ मध्ये गडकरी यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले होते.
हा पूल ज आॅगस्ट २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षीत होते. पण भूसंपादन, तांत्रिक अडचणी व कोरोनामुळे हे काम लांबणीवर पडले. त्यानंतर ३१ जानेवारी २०२३ ची मुदत देण्यातील आली. त्यानंतर आता जून २०२३ ही मुदत दिलेली आहे.
चांदणी चौक पाषाण एनडीए रस्ता या दरम्यान महामार्गावर नवा मोठ्या पुलासह एकूण आठ विविध मार्ग केले जात आहेत. त्यापैकी पाच मार्गांचे काम पूर्ण झाले आहे. अजून एक महामार्गावरील पूल, एक बावधनकडून साताऱ्याकडे जाणारा उड्डाणपूल आणि साताऱ्याकडून मुळशीकडे जाणाऱ्या भुयारी मार्गाचे काम अपूर्ण आहे.
पाषाण एनडीए रस्ता यांना जोडणारा हा पूल २ आॅक्टोबरला मध्यरात्री स्फोट करून पाडण्यात आला. त्यानंतर हा कठीण खडक फोडण्यासाठी अनेक वेळा स्फोट करण्यात आले. हे काम झाल्यानंतर नव्या पुलाचे पाया व आता पिलर उभारणीचे काम सुरू झालेले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पालखी मार्गाची हवाई पाहणी केल्यानंतर पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले, ‘‘चांदणी चौकाच्या उड्डाणपुलाचे काम पुण्यासाठी महत्त्वाचा विषय आहे.
एक मे रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची वेळ घेऊन या उड्डाणपुलाचे उद्घाटन करून. पुण्याचा रिंगरोड आम्ही करण्यासाठी आम्ही तयार होतो पण त्यातील काही भाग राज्य सरकार करणार आहे, तर काही भाग आम्ही करत आहोत. हा रिंगरोड झाल्यानंतर पुण्यातील वाहतुकीचा भार काही प्रमाणात कमी होईल.
नवले पुलासाठी नवीन डीपीआर
सातारा- मुंबई राष्ट्रीय महामार्गावर नवले पूल येथे वारंवार अपघात होत आहेत त्याबद्दल विचारले असता, गडकरी म्हणाले, ‘‘स्पीड कॅमेरे लावले आहेत. या ठिकाणी जेवढे करता येईल तेवढ्या उपाय योजना केल्या आहेत. आता या पूर्ण महामार्गाचाच नवीन डीपीआर तयार करण्यास सांगितले आहे. पण त्याला मोठा खर्च आहे.’’
मी घोषणा करणाऱ्यातील नाही
मी फक्त घोषणा करणाऱ्यातील नाही. पुणे महापालिकेला स्काय बससाठी सर्वेक्षण, डीपीआर तयार करू माझ्याकडे प्रस्ताव पाठवा असे सांगितले आहे, पण तो अद्याप आलेला नाही. देशभरात एकूण २६० रोप वे, केबल कारचे काम केले आहे, असे गडकरी यांनी सांगितले.