पुण्याचे नगर नियोजन खाते "भुक्कड ' आणि "होपलेस' : गडकरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

नगर नियोजन खात्यावर जोरदार टीका करीत गडकरी म्हणाले, की सिंगापूरच्या धर्तीवर नगर विकासाचे नियोजन व्हायला हवे. पुणे- सातारा रस्ता रूंदीकरणाचं काम रखडले हा खरे तर काळा डाग आहे. समस्या आहेत. पण त्या सोडवून सहा महिन्यात या रस्त्याचे काम पूर्ण करू

पुणे : ''पुण्याचे नियोजन करण्यासाठी 20 वर्षे लावणारे नगर नियोजन खाते हे होपलेस आहे. हे खाते फुकटाला महाग असून अशी भुक्कड संस्था मी अद्याप पाहिली नाही,'' अशा शब्दांत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसरकारला घरचा आहेर दिला.

नगर नियोजन खात्याऐवजी बाहेरची संस्था नेमा आणि पुण्याचा विकास करा, असा सल्लाही गडकरी यांनी यावेळी दिला. चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. नगर नियोजन खात्यावर जोरदार टीका करीत गडकरी म्हणाले, की सिंगापूरच्या धर्तीवर नगर विकासाचे नियोजन व्हायला हवे. पुणे- सातारा रस्ता रूंदीकरणाचं काम रखडले हा खरे तर काळा डाग आहे. समस्या आहेत. पण त्या सोडवून सहा महिन्यात या रस्त्याचे काम पूर्ण करू.

पुणे मेट्रोबाबत बोलताना गडकरी म्हणाले, पुण्यात मेट्रो वरून चर्चा सुरु असून नागपूरपेक्षाही चांगली मेट्रो पुण्यात निर्माण होणार आहे. कारण, नागपूर येथील आधिकारी आणि कर्मचारीच या मेट्रोचे काम करणार आहेत. गडकरी आणि फडणवीस नागपूरचे आहेत, त्यांचे पुण्याकडे लक्ष नाही अशी चर्चा सतत चालू असते. मात्र, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नसून आमच्या दोघांचेही पुण्यासह सबंध महाराष्ट्रावर लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

शरद पवार म्हणाले, " रस्ते हे विकासाचे साधन असते. सुलभ आणि मर्यादित वेळेत दळणवळणाचे साधन उपलब्ध असणे परिसराच्या विकासासाठी आवश्‍यक आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून रेंगाळलेल्या अनेक प्रकल्पांना गती मिळाल्याचा आनंद आहे.''

Web Title: nitin gadkari pune bjp development