जातीचं नाव काढेल, त्यांना ठोकून काढेन: नितीन गडकरीं

Nitin Gadkari
Nitin Gadkari

पिंपरी :  आमच्याकडील पाच जिल्ह्यांत जातीला कोणतेही स्थान नाही. कारण, आम्ही त्यांना इशाराच दिला आहे जातीचे नाव काढले तर ठोकून काढीन. देशातील आदिवासी, पारधी अशा वंचितांना गावातच रोजगार मिळावा, यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून पडीक जमिनींचा विकास केला जाणार आहे,'' असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी (ता. 10) केले. 

क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम परिसरात भूमिवंदन, कुर्डुवाडी- सोलापूर- उस्मानाबाद परिसरातील पारधी कुटुंबांना गाईंचे वाटप आणि पुणे सायन्स फोरमने गुरुकुलममध्ये सुरू केलेल्या "डिजिटल सायन्स लॅब'चे उद्‌घाटन झाले. त्यानंतर प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित समारंभात गडकरी बोलत होते. महापौर राहुल जाधव, खासदार अनिल शिरोळे, भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, शिपिंग कॉर्पोरेशन बोर्डाचे अध्यक्ष प्रदीप रावत, राज्य मदत व पुनर्वसन, पुनर्स्थापना महामंडळाचे उपाध्यक्ष माधव भांडारी, समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, राज्य लोकलेखा समिती अध्यक्ष ऍड. सचिन पटवर्धन, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते. 

गडकरी म्हणाले, "मागासलेपणा व शिक्षणापासून वंचित मुलांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न गुरुकुलमच्या माध्यमातून होत आहे. जात, धर्म, पंथ, विषमता नष्ट होऊन आर्थिक, सामाजिक समता प्रस्थापित करायची आहे. त्यासाठी माहिती तंत्रज्ञानापासून जैवतंत्रज्ञानापर्यंतच्या विविध क्षेत्रांत संशोधन करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. कारण माणसं वाईट नसतात, परिस्थिती वाईट असते, ती सुधारायची आहे. स्वराज्याला सुराज्य व देशाला महासत्ता बनविण्यासाठी पीडित, वंचितांना घडवावे लागणार आहे. सामर्थ्यवान राष्ट्रनिर्मितीसाठी सामाजिक, आर्थिक परिवर्तन होणे गरजेचे आहे.'' 

गिरीश प्रभुणे म्हणाले, "क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीतर्फे कुर्डुवाडी, माढा, मोहोळ, करमाळा, तुळजापूर, उस्मानाबाद परिसरातील पारधी बांधवांच्या सर्वांगीण विकास प्रकल्पांतर्गत (बीआरएलएफ) दोनशे पारधी कुटुंबांना दूधप्रक्रिया उद्योगासाठी चारशे देशी गाई देण्यात येणार आहेत. त्यातील प्रातिनिधिक दहा कुटुंबांना गाईंचे वाटप केले.'' ऍड. सतीश गोरडे यांनी आभार मानले. 

गुरुकुलमला पाच कोटी 
डेहराडून व गडचिरोली परिसरातील वंचितांसाठी राबवीत असलेल्या उपक्रमांचा उल्लेख करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, "जट्रोफा, बांबू अशा वनस्पतींपासून इंधननिर्मितीचा प्रयोग यशस्वी झाला आहे, त्यामुळे पडीक जमिनींवर अशी झाडे लावून आदिवासी, पारधी अशा वंचित घटकांना रोजगार उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुनरुत्थान समरसता गुरुकुलमला शिपिंग कंपन्यांच्या सीएसआर फंडातून (सामाजिक दायित्व निधी) पाच कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. गुरुकुलमसाठी 15 एकर जागा 30 वर्षांच्या करारावर देण्यासाठी महापालिका व प्राधिकरणाने व्यवस्था करावी.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com