'एनआयव्ही'मध्ये लागला 'निपाह' विषाणूंचा शोध

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

पुणे - केरळमध्ये "निपाह' विषाणूंमुळे होणाऱ्या संसर्गजन्य रोगाने सहा जणांचा मृत्यू झाला. या निपाह विषाणूंचा सर्वप्रथम शोध पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, एनआयव्ही) संशोधकांनी लावल्याची माहिती पुढे आली आहे.

पुणे - केरळमध्ये "निपाह' विषाणूंमुळे होणाऱ्या संसर्गजन्य रोगाने सहा जणांचा मृत्यू झाला. या निपाह विषाणूंचा सर्वप्रथम शोध पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, एनआयव्ही) संशोधकांनी लावल्याची माहिती पुढे आली आहे.

"एनआयव्ही'मध्ये काही वर्षांपूर्वी रक्त नमुने "एलायझा' चाचणीसाठी आले होते. त्या वेळी संशोधकांनी "निपाह' विषाणूंचा सर्वप्रथम शोध लावला. "निपाह' विषाणू नेमका कोठून येतो, त्यामुळे होणाऱ्या आजारांची प्राथमिक लक्षणे कोणती, याची शास्त्रीय माहिती पुण्यातील शास्त्रज्ञांनी शोधली होती.

या संशोधनानुसार, निपाह हा घातक विषाणू डुक्कर व वटवाघुळ यांच्या लाळेपासून तयार होतो. डुक्कर पालन करणाऱ्या मलेशियातील शेतकऱ्यांत जगात सर्वप्रथम हा विषाणू दिसून आला. वटवाघळांच्या लाळेमध्ये हा विषाणू आढळतो. विषाणूंच्या संसर्गाने व्यक्तीला मेंदुज्वर होतो. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर हा विषाणू व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो. यावर आतापर्यंत कोणतेही ठोस औषध उपलब्ध नाही. परंतु, लक्षणांवरील औषधोपचार दिला जातो. डुक्कर किंवा वटवाघळांनी अर्धवट खाल्लेली फळे खाल्ल्याने हा विषाणू शरीरात प्रवेश करतो. ताप, डोकेदुखी, अंगदुखी, मळमळ व उलट्या, मान दुखणे, मानसिक गोंधळ अशी लक्षणे दिसतात. योग्य वेळी वैद्यकीय उपचार न मिळाल्यास व्यक्ती कोमामध्ये जाण्याची शक्‍यता असते. रक्त नमुना तपासणीची सुविधा फक्त "एनआयव्ही'मध्ये उपलब्ध आहे.

'निपाह'पासून बचावासाठी हे करा...
- डुक्कर आणि डुक्कर हाताळणी करणाऱ्यांपासून संपर्क टाळा
- हात नियमित स्वच्छ धुवून आरोग्य नीट ठेवावे
- कच्ची फळे, झाडावरील अर्धवट खाल्लेली फळे टाळा
- भाजीपाला, फळे स्वच्छ धुवून घ्या
- सुरक्षिततेसाठी एन95 मास्क वापरा
- ताप, डोकेदुखी, अंगदुखी, मळमळ व उलट्या,
मानदुखी, मानसिक गोंधळ ही लक्षणे दिसल्यास तत्काळ वैद्यकीय उपचार घ्या

Web Title: NIV Nipah virus