निवेदिता साबू यांना भारत गौरव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रातून समाजकार्य करणाऱ्या निवेदिता साबू यांना नुकताच भारत गौरव पुरस्कार देऊन, दिल्लीत सन्मानित करण्यात आले. भारत गौरव फाउंडेशनमार्फत हा पुरस्कार विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देण्याऱ्या व्यक्तींना दिला जातो. 

पुणे - फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रातून समाजकार्य करणाऱ्या निवेदिता साबू यांना नुकताच भारत गौरव पुरस्कार देऊन, दिल्लीत सन्मानित करण्यात आले. भारत गौरव फाउंडेशनमार्फत हा पुरस्कार विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देण्याऱ्या व्यक्तींना दिला जातो. 

समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, याच विचारातून निवेदिता या नेहमी कार्यरत असतात. यासाठी तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रातूनही योगदान देऊ शकता, असे त्यांनी नमूद केले. फॅशनच्या या कार्यातून त्या मूक-बधिर मुलींना रोजगार देणे, अंध मुलांनी काढलेल्या चित्रांचा फॅशनमध्ये प्रिंट म्हणून वापर करून ‘लंडन फॅशन वीक‘ फॅशन शो सादर करणे यात त्यांचा मोलाचा वाटा होता. तसेच ॲसिड हल्ला झालेल्या तरुणींच्या मनाला नवी उभारी देण्यासाठी त्यांनी ‘तत्त्व’ हा ॲसिड हल्ला झालेल्या मुलींचा फॅशन शो देखील आयोजित केला होता. सध्या त्या विविध प्रकारच्या दिव्यांगांचा अभ्यास करून त्या लोकांसाठी फॅशनच्या माध्यमातून, त्यांच्यासाठी रोजच्या वापरासाठी सोयीस्कर असे विशेष डिझाइनचे पैलू असणारे कपडे डिझाइन करतात. तसेच त्यांच्यासाठी योजनाही आखत आहेत. ‘अड्रेस नाऊ’ या दिव्यांगांसाठी कपडे डिझाइन करणाऱ्या स्पर्धेमार्फत त्यांनी जनजागृती केली आहे. निवेदिता या भारतीय फॅशन जगभरात पोचवण्याचे काम करत असतात. त्यांनी आजवर लंडन फॅशन वीक, पॅरिस फॅशन वीक, सेऊल, दक्षिण कोरिया, हाँगकाँग, मलेशिया, कान्स फिल्म फेस्टिवल आणि कोलोंबो फॅशन वीक अशा अनेक मानाच्या फॅशन वीकमध्ये सहभाग घेतला आहे. 

फॅशनच्या माध्यमातून कला आणि विज्ञान यांचा संगम केला पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनशैलीनुसार त्यांचा आत्मविश्‍वास वाढवण्यासाठी फॅशनच्या माध्यमातून योगदान दिले पाहिजे.
- निवेदिता साबू, फॅशन डिझायनर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nivedita Saboo fashion designer Bharat Gaurav Award