केवळ एका डॉक्‍टरवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

पुणे - महापालिकेच्या राजीव गांधी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या डॉक्‍टरविरोधात कारवाई करताना आरोग्य खात्याने टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दोघा डॉक्‍टरांना निलंबित करण्याची घोषणा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत करूनही केवळ एकाच डॉक्‍टरचे निलंबन करण्यात आले आहे, तर दुसऱ्या डॉक्‍टरला नोटीस बजावण्यात आली आहे. निष्पाप महिलेला जीव गमवावा लागल्यानंतरही निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

प्रसूतीसाठी रुग्णालयात गेलेल्या शुभांगी जानकर या महिलेचा तेथील डॉक्‍टरांच्या बेजबाबदारणामुळे मृत्यू झाल्याचे तपासात उघड झाले होते. डॉक्‍टरांनी शुभांगी यांची वेळेत दखल न घेतल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही घटनेचे पडसाद उमटले होते. याप्रकरणी दोन्ही डॉक्‍टरांचे निलंबन करण्याची मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी लावून धरली होती. यामुळे प्रशासनाला सभेतच दोन्ही डॉक्‍टरांच्या निलंबनाची घोषणा करावी लागली होती. डॉ. वैभव बगाडे आणि डॉ. विजय बडे यांच्या निलंबनाचा आदेश काढण्यात येत असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी जाहीर केले. प्रत्यक्षात मात्र, डॉ. बगाडे यांना निलंबित करण्यात आले, तर डॉ. बडेंना नोटीस बजावून खुलासा मागविला. महिलेच्या मृत्यूप्रकरणी डॉक्‍टरांवरील कारवाईचा तोंडदेखलेपणा करणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सभागृहाचीही दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाले आहे. 

जानकर मृत्यू प्रकरणाची खातेअंतर्गत चौकशी करण्यात येत आहे. तोपर्यंत डॉ. बगाडे आणि बडे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. डॉ. बगाडेंना निलंबित केले आहे. तसेच, चौकशी होईपर्यंत वेतनवाढही रोखण्यात आली आहे. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होईल. 
- डॉ. अंजली साबणे, प्रभारी आरोग्यप्रमुख, महापालिका 

Web Title: no action on PMC municipal Rajiv Gandhi Hospital doctor