पुण्यात वाहतुकीचा वेग मंदावला; रिक्षा अन् कॅबही मिळेना!

मंगेश कोळपकर
रविवार, 4 ऑगस्ट 2019

सततच्या पावसाने शहरातील वाहतुकीचा वेग मंदावल्याचे रविवारी दिसून आले. मध्यभागात वाहतुकीची कोंडी कायम होती तर, उपनगरे त्या मानाने निवांत होती. मध्यभागातील प्रवासासाठी रिक्षाचालकांप्रमाणेच कॅबचालकांनीही प्रवाशांना वाकुल्या दाखविल्या. 

पुणे : सततच्या पावसाने शहरातील वाहतुकीचा वेग मंदावल्याचे रविवारी दिसून आले. मध्यभागात वाहतुकीची कोंडी कायम होती तर, उपनगरे त्या मानाने निवांत होती. मध्यभागातील प्रवासासाठी रिक्षाचालकांप्रमाणेच कॅबचालकांनीही प्रवाशांना वाकुल्या दाखविल्या. 

रविवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. काही ठिकाणी जोरात तर, काही ठिकाणी पाऊस कमी होती. खडकवासला धरणातून 35 हजार क्‍यूसेकने विसर्ग झाल्यामुळे मुठा नदीला पूर आला. हा पूर पाहण्यासाठी संभाजी पूल, बालगंधर्व पूल, नवा पूल, राजाराम पूल, बंडगार्डन पूल आदी ठिकाणी नागरिकांची गर्दी झाली होती. भर पावसातही मक्‍याची कणसे हातोहात विकली जात होती तर, नंतर पावले आपोपाप चहाच्या ठेल्याकडे वळत होती. 

पहिला श्रावणी सोमवार उद्या(ता.5) असल्यामुळे महात्मा फुले मंडईत गर्दी होती. त्यातच नदीपात्रातील रस्ता बंद झाल्यामुळे लक्ष्मी रस्ता, कुमठेकर, केळकर, टिळक रस्ता, कसबा पेठ, जंगली महाराज रस्त्यावर गर्दी झाली होती. मध्यभागात कोंडी असल्यामुळे कॅबचालकही रिक्षांचालकांप्रमाणे वागत होते. जवळच्या अंतरावरील राईडसाठी दिलेल्या वेळेपेक्षा उशीर करीत असल्यामुळ वाट पाहून प्रवासी राईड कॅन्सल करीत होते तर, रिक्षाचालकांनी जवळच्या अंतरासाठी असहकार ठेवला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No cab and auto rickshaw due to Traffic slows down in Pune