उमेदवार यादीचे गुऱ्हाळ सुरूच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

पुणे - चर्चेचे गुऱ्हाळ, वाद-विवाद, केंद्रीय आणि राज्य स्तरावरील नेत्यांच्या हस्तक्षेपानंतरही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी बुधवारी प्रसिद्ध होऊ शकली नाही. अखेर ही यादी गुरुवारी (ता. २) जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

पुणे - चर्चेचे गुऱ्हाळ, वाद-विवाद, केंद्रीय आणि राज्य स्तरावरील नेत्यांच्या हस्तक्षेपानंतरही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी बुधवारी प्रसिद्ध होऊ शकली नाही. अखेर ही यादी गुरुवारी (ता. २) जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

भाजपची यादी अंतिम करण्यासाठी मंगळवारी रात्री ८ वाजता सुरू झालेली बैठक एक-दोन ब्रेकनंतर बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास संपली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बराच वेळ सहभाग घेतला. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासह पक्षाचे शहरातील खासदार, आमदार यांच्या मंथनानंतर ८० उमेदवारांच्या नावांवर एकमत झाले. उर्वरित ८२ नावांबाबत लोकप्रतिनिधी आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लेखी सूचना केल्या आहेत. त्याची दखल घेऊन पक्षाकडून आता अंतिम यादी तयार होत आहे.
पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची घोषणा बुधवारी होण्याची शक्‍यता होती; परंतु प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे बुधवारी दिल्लीत होते. सायंकाळी उशिरा ते मुंबईत परतले. त्यानंतर चर्चेच्या फेऱ्या पुन्हा रंगल्या आणि त्या रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. आमदारांना नाराज न करता आणि उर्वरित लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांमध्ये सहमती निर्माण करून उमेदवारांची यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे पहिली यादी गुरुवारी जाहीर होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ज्येष्ठांनाही संधी द्या
उज्ज्वल केसकर, गोपाळ चिंतल, श्‍याम सातपुते, ज्योत्स्ना सरदेशपांडे, बाळासाहेब किरवे, लता बनकर या पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना उमेदवारांमध्ये सामावून घ्यावे, यासाठी भाजपमधील एक गट बुधवारीही प्रयत्नशील होता. आयारामांना उमेदवारी देतानाच पक्षाच्या पडत्या काळात ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टांची जाणीव ठेवावी आणि त्यांना संधी द्यावी, असा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे सुरू होता.

संकेतस्थळ पुन्हा ‘हॅंग’ झाले तर?
दरम्यान, अनेक उमेदवारांनी दोन गटांतून, तसेच पती-पत्नीचे अर्ज भरण्याची तयारी सुरू केली आहे; परंतु पक्षाची यादी निश्‍चित होत नसल्यामुळे ते धास्तावले आहेत. गुरुवारी-शुक्रवारी जवळपास सर्वच पक्षांचे इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने त्या काळात राज्य निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ पुन्हा ‘हॅंग’ झाले किंवा तांत्रिक अडचणी उद्‌भवल्या तर काही जणांची संधी हातातून निसटू शकते, याकडेही पक्षाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी अनेक जण नेत्यांशी संपर्क साधत होते.

Web Title: no candidate list