‘एटीएम’मध्ये खडखडाट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

माझ्या यजमानांना अमरावतीला जायचे होते. त्यामुळे सोमवारी आम्ही कसबा पेठेतील विविध बॅंकांच्या एटीएममध्ये गेलो; परंतु कोठेही पैसे मिळाले नाहीत. अखेर घरखर्चासाठी ठेवलेले पैसे त्यांना द्यावे लागले.
- आरती देसाई, नागरिक

पुणे - रिझर्व्ह बॅंकेकडून अर्थपुरवठा होत नसल्याने बॅंकांकडे ग्राहकांना द्यायला पुरेशी रोकड उपलब्ध नाही. ग्राहकही बॅंकेत रोख रकमेचा भरणा पुरेशा प्रमाणात करीत नसल्याने बॅंकांना उपलब्ध रकमेचे रेशनिंगच करावे लागत आहे. रोकड उपलब्ध होत नसल्याने एटीएममध्येही भरणा करणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून बहुतांश राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या एटीएमबाहेर ‘रोकड संपली आहे’चे फलक पाहायला मिळत आहेत.

भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून (आरबीआय) बॅंकांच्या करन्सी चेस्टला होणारा अर्थपुरवठा अनियमित आहे. त्यातच ग्राहकही रोख रक्कम आपल्याकडेच साठवून ठेवत आहेत. त्यामुळे चलनवलनाकरिता रोख रकमेसाठी बॅंकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बॅंकेत तीस टक्के; तर एटीएममध्ये सत्तर टक्के रक्कम असावी, असा आरबीआयचा नियम आहे; परंतु नियमांचे पालन करण्यासाठी आरबीआयकडून पुरेशा प्रमाणात रोकड येत नसल्याची बॅंकांची तक्रार आहे. केलेल्या अर्थपुरवठ्यापैकी काही रक्‍कम सहकारी बॅंकांना देण्याच्या सूचना आरबीआयने राष्ट्रीयीकृत बॅंकांना दिल्या आहेत. त्यामुळे एटीएममध्ये भरायला पुरेसे पैसे नसतात. परिणामी, प्रामुख्याने बाजारपेठेतील एटीएममध्ये नियमित रोकड भरली जाते. मात्र, उपनगरांतील एटीएममध्ये आठ ते पंधरा दिवसांनी रोकड भरावी लागत असल्याचे बॅंकांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यातच दोन हजाराच्या नोटांचे प्रमाण घटल्याने एटीएममध्ये पाचशे आणि शंभरच्या नोटा अधिक प्रमाणात भराव्या लागतात. त्यानंतर काही वेळातच केंद्रावरची रोकड संपल्याचे फलक लावावे लागत आहेत.

स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या सरव्यवस्थापक (एटीएम) मालविका भट म्हणाल्या, ‘‘आरबीआयकडून करन्सी चेस्टला फार कमी रोकड येत आहे. गेल्या काही दिवसांपासून ही परिस्थिती आहे. दोन हजार रुपयांच्या नोटाही कमी येत असल्याने पाचशे, शंभरच्या नोटा एटीएममध्ये भरण्यावर मर्यादा येत आहेत. बहुतांश राष्ट्रीयीकृत बॅंकांची हीच स्थिती आहे.’’

Web Title: No cash in ATM

टॅग्स