‘नो एंट्री’तून वाहनांची बेकायदा ‘एंट्री’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी ते निगडीदरम्यान मुख्य व सेवारस्त्यावर ये-जा करण्यासाठी ‘इन’ व ‘आउट मार्जिंग’ ठेवले आहेत. मात्र, बहुतांश वाहनचालक याकडे दुर्लक्ष करून धोकादायकरीत्या ‘नो एंट्री’तून वाहने दामटतात. त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो व वाहतूक कोंडीही होते.

पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी ते निगडीदरम्यान मुख्य व सेवारस्त्यावर ये-जा करण्यासाठी ‘इन’ व ‘आउट मार्जिंग’ ठेवले आहेत. मात्र, बहुतांश वाहनचालक याकडे दुर्लक्ष करून धोकादायकरीत्या ‘नो एंट्री’तून वाहने दामटतात. त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो व वाहतूक कोंडीही होते.

दापोडी ते निगडीदरम्यान महामार्गाचे रुंदीकरण झाले आहे. त्यामुळे मुख्य रस्ता व सेवारस्ता असे विभाजन केले आहे. मुख्य रस्त्यावर पिंपरीतील खराळवाडी ते मोरवाडी, चिंचवड स्टेशन आणि आकुर्डी या ठिकाणी ग्रेडसेपरेटर उभारले आहेत. त्यामुळे वाहने सुसाट जातात. शहराच्या अंतर्गत भागात जाण्यासाठी सेवारस्ता आहे. मुख्य रस्त्यावरून सेवारस्त्याने अंतर्गत भागात जाण्यासाठी व अंतर्गत भागातून सेवारस्त्यावरून मुख्य रस्त्यावर येण्यासाठी ‘इन’ व ‘आउट’ मार्गिका ठेवल्या आहेत. त्या फुगेवाडी, कुंदननगर, कासारवाडी, एचए कंपनी, खराळवाडी, मोरवाडी, चिंचवड स्टेशन काळभोरनगर, बजाज ऑटो, निगडी आदी आहेत; परंतु बहुतांश वाहनचालक ‘इन’ मार्गिकेतून सेवारस्त्यावर जातात; तर ‘आउट’ मार्गिकेतून मुख्य रस्त्यावर येतात. यासाठी त्यांना विरुद्ध बाजूने ‘यू-टर्न’ घ्यावा लागत असल्याने वाहन वळविण्यास विलंब होतो. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो, असे प्रकार रोखण्यासाठी ‘इन’-‘आउट’ मार्गिकेच्या ठिकाणी ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त करण्याची आवश्‍यकता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Entry Vehicle Illegal Entry