कमला नेहरू रुग्णालयात आयसीयू स्ट्रेचरवरच!

kamla nehru hospital
kamla nehru hospital

पुणे : स्वतःचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे स्वप्न महापालिका पाहात आहे. एकीकडे हे स्वप्न पाहणाऱ्या पालिकेला मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयात अतिदक्षता विभाग (आयसीयू) सुरू करण्यास दहा वर्षांनंतरही यश आलेले नाही. त्यामुळे गरीब रुग्णांना नाईलाजास्तव खासगी रुग्णालयांची पायरी चढावी लागत आहे. 

सत्ताधारी भाजपकडून महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी खटाटोप सुरू आहे. ६२२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला नुकतीच सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. भारतरत्न अटलबिहारी वायपेयी यांच्या नावाने सुरू केले जाणारे वैद्यकीय महाविद्यालय पुणे स्टेशनजवळील नायडू रुग्णालयात उभारले जाणार आहे. हे महाविद्यालय चालविण्यासाठी वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट स्थापन केले जाणार आहे. यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच अहमदाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी केली. 

एकीकडे भाजपने वैद्यकीय महाविद्यालयाचा मुद्दा लावून धरला असताना, दुसरीकडे २००९ मध्ये मंगळवार पेठेत ३९ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या कमला नेहरू रुग्णालयाची दुरवस्था झाली आहे. या रुग्णालयाच्या इमारतीचे उद्‌घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले होते. या ठिकाणी नर्सिंग होमसह सोनोग्राफी, विविध प्रकारच्या तपासण्या, लहान मुलांवरील उपचाराचे विभाग सुरू केले. तसेच रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर ‘आयसीयू’ सुरू करण्यासाठीही प्रयत्न झाले. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून महागडे बेड, अद्ययावत यंत्रसामग्री खरेदी करण्यात आली. खरेदी केलेले साहित्य रुग्णालयाच्या खोलीत पडून आहे. 

कमला नेहरू रुग्णालयात आयसीयू सुरू केले जाणार होते; पण त्यासाठी तज्ज्ञ डॉक्‍टर नसल्याने ते सुरू केले नव्हते. हे आयसीयू संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. जुनी यंत्रसामग्री व नव्याने ८५ लाख रुपयांचे साहित्य खरेदी करून आयसीयू सुरू केले जाईल.
- डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्यप्रमुख, महापालिका 

महापालिकेची मोठी रुग्णालये - ४
नर्सिंग  होम  - १८
वर्षभरातील  रुग्णांची संख्या   - १.२५ लाख
आरोग्य विभागाचा खर्च - २८० कोटी
प्राथमिक उपचार केंद्रे - ६२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com