अरे बापरे! याठिकाणी तपासणी कीटच उपलब्ध नाही; संशयित परतले घरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जुलै 2020

माणिकबाग येथील एका सोसायटीत ज्येष्ठ महिलेला संसर्ग झाला होता. महापालिकेच्या वतीने येथे खबरदारीच्या उपाययोजनाही  राबविण्यात आल्या. त्यानंतर ज्येष्ठ महिलेच्या संपर्कात आलेल्या १२ नागरिकांना तपासणी करण्यासाठी महापालिकेच्या वाहनामधून  घेऊन जाण्यात आले. त्या वाहनात इतर भागातील नागरिकही उपस्थित होते. मात्र, अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर संबंधित क्वारंटाइन केंद्रात तपासणी कीट उपलब्ध नसल्याचे कारण सांगण्यात आले.​

सिंहगडरस्ता - माणिकबागेतील एका सोसायटीतील कोरोना रुग्णाच्या संपर्कातील १२ नागरिकांना सिंहगड महाविद्यालयातील क्वारंटाइन सेंटरमध्ये घेऊन जाण्यात येत होते. दरम्यान, तेथे तपासणी कीट उपलब्ध नसल्याकारणास्तव त्यांना निम्म्या रस्त्यातून घरी परतावे लागले. ही घटना आज(ता.७) घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माणिकबाग येथील एका सोसायटीत ज्येष्ठ महिलेला संसर्ग झाला होता. महापालिकेच्या वतीने येथे खबरदारीच्या उपाययोजनाही  राबविण्यात आल्या. त्यानंतर ज्येष्ठ महिलेच्या संपर्कात आलेल्या १२ नागरिकांना तपासणी करण्यासाठी महापालिकेच्या वाहनामधून  घेऊन जाण्यात आले. त्या वाहनात इतर भागातील नागरिकही उपस्थित होते. मात्र, अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर संबंधित क्वारंटाइन केंद्रात तपासणी कीट उपलब्ध नसल्याचे कारण सांगण्यात आले. त्यानंतर गाडी माघारी फिरली आणि सर्व कोरोना संशयित नागरिकांना घरी पाठविण्यात आले. या नागरिकांमध्ये काही ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. घडलेल्या प्रकारामुळे मानसिक त्रास सहन करावा लागला असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सिंहगड रस्ता परिसरात रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

राज्य सरकारमध्ये खरचं अस्वस्थता आहे का? वाचा शरद पवार यांचं उत्तर

टोलवाटोलवीचा आणखी बळी 
खासगी रुग्णालयातील टोलवाटोलवीमुळे नुकताच एका ज्येष्ठाला जिवाला मुकावे लागले. या घटनेची पुनरावृत्तीचा अनुभव सिंहगड रस्त्यावरील एका कुटुंबाला आला. त्या कुटुंबातील ४५ वर्षीय व्यक्तीला अशाचप्रकारे जीव गमवावा लागला. 

विजय गोसावी (रा. सिंहगड रस्ता, हिंगणे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गोसावी यांना अन्ननलीकेचा त्रास होता. त्यांना उपचारासाठी परिसरातील एका खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यात आले.  तेथे त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. खर्चाचा अंदाज देण्यात आला. मात्र, ते आपल्या आवाक्‍याबाहेरचे असल्याचे रुग्णाच्या वडिलांनी सांगताच रुग्णालयाकडून उपचारासाठी योग्य ती साधन सामग्री नसल्याचे सांगण्यात आले. त्यावर त्यांनी परिसरातील दुसऱ्या मोठ्या खासगी  रुग्णालयात विचारपूस केली. तेथेही त्यांनी रक्कम जमा करण्यास अवधी मागितल्यावर रुग्णासाठी बेडच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर कात्रज परिसरातील एका महापालिकेच्या रुग्णालयात गोसावी यांना घेऊन जाण्यात आले. मात्र, तेथेही कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती. अखेर त्यांना सोमवारी रात्री उशिरा ससूनमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, आज (ता.७) त्यांचा मृत्यू झाला. 

'कोरोना प्रतिबंधासाठी कडक उपाययोजना करा'

हवेलीत २८ रुग्णांची भर 
खडकवासला : हवेलीमध्ये सोमवार (ता.६) अखेर कोरोनाचे नवीन २८ रुग्ण आढळले. त्यातील १७ रुग्ण तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील आहेत. तालुक्‍यातील एकूण रुग्णांची संख्या ५५५ झाली आहे, अशी माहिती  डॉ.सचिन खरात यांनी दिली. 

तालुक्‍यात आतापर्यंत आठ जणांचे मृत्यू झाले आहेत. नांदेड येथे ६, खडकवासल्यामध्ये ४ तर कोंढवे धावडे येथे ३, खानापूर येथे २, नऱ्हे, किरकटवाडी येथे प्रत्येकी एक एक रुग्ण आढळले आहेत. पूर्व भागात उरुळी कांचन येथे ५ रुग्ण सापडले आहेत. हांडेवाडीत २, मांजरी बुद्रूक, तुळापूर, पिंपरी सांडस, बकोरी येथे प्रत्येकी एक एक आढळले आहेत. दिवसभरात तालुक्‍यात नवीन २८ रुग्ण वाढले. एकूण रुग्णांपैकी सध्या २७७ जणांवर उपचार सुरू आहे. तर २७०जण बरे झाले आहेत, असे ही खरात यांनी सांगितले.

रूग्णसंख्येत वाढ होत असल्याने  तपासणी यंत्रणाही कमी पडत आहे. तपासणी किट उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. या किटवर तपासणी करण्यासाठी संबंधितांना प्रशिक्षण दिले जात आहे. 
- संभाजी खोत, सहायक आयुक्त, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No inspection kits are available here The suspect returned home