‘किरकी’ नव्हे यापुढे ‘खडकी’च राहणार

पांडुरंग सरोदे
बुधवार, 19 एप्रिल 2017

इंग्रजांनी केलेला अपभ्रंश बदलण्यात येणार 

इंग्रजांनी केलेला अपभ्रंश बदलण्यात येणार 
पुणे - ब्रिटिशकाळापासून आजही सरकारी कागदपत्रांमध्ये, लष्कराच्या फलकांवर खडकीला ‘किरकी’ हा शब्द वापरला जात आहे. मात्र इथून पुढे ‘किरकी’ हा शब्द कॅंटोन्मेंट, लष्कर किंवा केंद्र सरकारच्या कुठल्याही कामासाठी वापरण्यात येणार नाही. खडकीचे ‘किरकी’ नव्हे, तर ‘खडकी’ हाच शब्द वापरण्यात यावा, यासाठी अमोल जगताप या मराठी अधिकाऱ्याने ऐतिहासिक संदर्भ देत संरक्षण मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला आहे. खडकी कॅंटोन्मेंटला आगामी वर्षी दोनशे वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त इंग्रजांनी ठेवलेले ‘किरकी’ हे नाव दोनशे वर्षांनंतर हद्दपार होण्याची महत्त्वपूर्ण घटनाही घडत आहे. 

ब्रिटिशांच्या आगमनानंतर १८१८ मध्ये खडकी कॅंटोन्मेंटची स्थापना झाली. मात्र ब्रिटिशांनी खडकीचे नाव ‘किरकी’ असे वापरण्यास सुरवात केली. सरकार दफ्तरीही त्यांनी ‘किरकी’ अशीच नोंद केली. स्वातंत्र्योत्तर कालखंडानंतरही व्यक्ती, संस्था, संघटना, कॅंटोन्मेंटसह संरक्षण मंत्रालयाकडून हेच नाव वापरले जात आहे. मात्र एक-दीड वर्षांपूर्वी कॅंटोन्मेंटच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अमोल जगताप यांनी ‘किरकी’ या शब्दाचा शोध घेतला. 

आपले दैनंदिन काम सांभाळत ‘किरकी’ व ‘खडकी’ या नावांचे जगताप यांनी ऐतिहासिक संदर्भ शोधले. त्यानंतरच खडकी हेच नाव कसे योग्य आहे, हे जगताप यांनी ठामपणे मांडले. ते म्हणाले, ‘‘इंग्रजांना खडकी या शब्दातील ‘ख’ व ‘ड’ उच्चारता येत नव्हते. त्यामुळे त्यांनी ‘क’ व ‘र’चा वापर करून ‘किरकी’ असे नाव वापरले. आत्तापर्यंत ‘किरकी’ हे नाव चुकीचे आहे, ते बदलावे असे कोणासही वाटले नाही. हा प्रकार मला अयोग्य वाटला. म्हणूनच सर्व संदर्भ तपासले, त्यामध्ये ब्रिटिशांपूर्वीपासून खडकी हाच शब्द वापरल्याचे स्पष्ट झाले.’’  

इतिहास अभ्यासक मंदार लवाटे म्हणाले, ‘‘दोनशे वर्षांपूर्वीच्या पुणेकरांपासून ब्रिटिशांना भीती वाटत होती, तसा उल्लेखही आढळतो. त्यामुळेच ब्रिटिशांनी पुणे, खडकी व देहूरोड कॅंटोन्मेंट उभारले. इंग्रजांना काही मराठी शब्द उच्चारण्यास अडचण येत असल्यानेच त्यांनी त्यांच्या पद्धतीने गावांची नावे बदलली.’’
 

‘खडकी’ असा उल्लेख असलेले जुने संदर्भ 
 पेशवे-इंग्रज लढाई - खडकीची लढाई (५ नोव्हेंबर, १८१७)
 पोस्ट खात्यात पूर्वीपासून वापरण्यात येणारे नाव
 मुंबई - पुणे रेल्वे - खडकी स्टेशन (केके)
 निवडणूक आयोगाकडील नोंदणी 
 राज्य सरकारचे खरेदी-विक्री नोंदणी खाते  
 पुणे डिस्ट्रिक्‍ट गॅझेट

संरक्षण मंत्रालयाला संदर्भासह पत्र पाठविले असून, खडकी हेच नाव यापुढे वापरावे, असे स्पष्ट केले आहे. ‘किरकी’ या नावाऐवजी खडकी हेच नाव वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यादृष्टीने कॅंटोन्मेंटच्या वस्तूंवरही यापुढे खडकी हेच नाव वापरणार आहे.
- अमोल जगताप

Web Title: no kirkee only khadki