दुधात नाही ‘पोषण’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

तपासलेले नमुने - २४   अप्रमाणित नमुने - ५   लेबल दोष - ३   प्रमाणित नमुने - १६

पुणे - राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून शहरात विक्रीसाठी येणाऱ्या दुधाच्या २४ पैकी पाच नमुन्यांमध्ये पोषणमूल्ये नसल्याचा अहवाल राज्य आरोग्य प्रयोगशाळेने दिला आहे. तीन नमुन्यांमध्ये दुधाच्या पिशव्यांवर चुकीची पोषणमूल्ये देऊन पुणेकरांची फसवणूक होत असल्याची माहितीही यातून पुढे आली आहे.

पुण्यात दररोज सुमारे चार लाख लिटर दुधाची मागणी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दुधाचे उत्पादन पुण्यात होत नसल्याने शेजारील जिल्ह्यांमधून रोज या दुधाचा पुरवठा केला जातो. या जिल्ह्यांमधील डेअऱ्यांमधून बंदिस्त पिशव्यांमध्ये दूध भरून त्या पिशव्या वाहनातून शहरात आणल्या जातात. या मार्गांवर दुधाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी जानेवारीमध्ये केली होती. त्या दुधाचे नमुने तपासण्यासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविले होते. त्याच्या मिळालेल्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे. फॅट आणि सॉलिड नॉट फॅट प्रमाणात नसल्याचे प्रयोगशाळा अहवालात म्हटले आहे. दुधाचे प्रमाण वाढून नफा कमविण्यासाठी काही दूध डेअऱ्या फॅट आणि सॉलिड नॉट फॅटचे प्रमाण कमी करतात, अशी माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.

‘एफडीए’चे सहायक आयुक्त संपत देशमुख म्हणाले, ‘‘मोशी आणि लोणी काळभोर टोल नाक्‍यावरून काढलेले पाच नमुने अप्रमाणित ठरले आहेत. दुधातील फॅट आणि सॉलिड नॉट फॅटचे प्रमाण योग्य नाही. तसेच, तीन नमुन्यांमध्ये लेबल दोष आहे, त्यामुळे दुधात नसलेली पोषणमूल्ये असल्याचा दावा या लेबलवर केला होता. या दूध डेअऱ्यांविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.’’

अशी ठरते गुणवत्ता
दूध हे पोषक आहार आहे, त्यामुळे त्याची गुणवत्ता राखणे आवश्‍यक असते. त्याची गुणवत्ता म्हणजे त्यातील फॅट आणि सॉलिड नॉट फॅटचे प्रमाण योग्य असणे अपेक्षित आहे. गाईच्या दुधातील साडेतीन आणि म्हशीच्या दुधातील फॅट सहा असणे आवश्‍यक आहे. तसेच, गाईच्या दुधातही सॉलिड नॉट फॅटचे प्रमाण ८.५, तर म्हशीच्या दुधातही हे प्रमाण ९ असणे कायद्याने बंधनकारक केले आहे. दुधात फॅटचे प्रमाण कमी असल्यास त्यातून योग्य पोषणमूल्ये मिळत नाहीत.

असा होतो पुरवठा 
पुणे शहरातील दुधाची मागणी मोठी असल्याने सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर या जवळच्या जिल्ह्यांसह नाशिक, उस्मानाबाद येथील कळंब येथून दुधाचा पुरवठा होतो. डेअरीमधून पिशव्यांमध्ये भरून हे दूध शहरातील वितरकांकडे येते. तेथून किरकोळ विक्रेते ते घराघरांत पोचवतात.

महामार्गांवरून पुण्यात येणाऱ्या दुधाची अचानक तपासणी केली. त्यातून शहरात येणाऱ्या बहुतांश दुधाची गुणवत्ता चांगली असल्याचे दिसते. लेबल दोष असणाऱ्या डेअऱ्यांवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल. तसेच, दर्जा कमी असलेल्या दूध डेअऱ्यांची कसून तपासणी होईल.
- डॉ. शिवाजी देसाई, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, पुणे

Web Title: No milk nutrition