संविधान कोणीही बदलू शकत नाही - अविनाश महातेकर

Avinash-Mahatekar
Avinash-Mahatekar

पुणे - सत्तेवर असलेला कोणताही पक्ष भारतीय संविधान बदलू शकत नाही. संविधान बदलण्याची तरतूदच नाही. ज्या दिवशी संविधान बदलले जाईल, त्याच दिवशी भारत अमेरिकेचा गुलाम होईल, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी आज (ता. २१) येथे व्यक्त केले. 

भारतीय संविधान दिनाच्यानिमित्ताने पुण्यातील संविधान सन्मान समितीच्या वतीने संविधान जागर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचे उद्‌घाटन आणि संविधानरत्न पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, समितीचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड, ॲड. विवेक चव्हाण, नगरसेवक लता राजगुरू आदी उपस्थित होते. 

महातेकर म्हणाले, ‘‘भारत हा आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून दरवर्षी लाखो कोटींचे कर्ज घेणारा देश आहे. हे कर्ज घेण्यासाठी संबंधित देश हा जातीभेद मानणारा नसावा लागतो. त्यानुसार आमचा देश हा जातीभेद मानत नसल्याचा पुरावा म्हणून भारत सरकार दरवर्षी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेची प्रत आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडे पाठवत असते. ही प्रत पाठविल्यानंतर संबंधित कर्ज मिळते किंवा ते परतफेड करण्यासाठी सवलत मिळते.’’

या वेळी अर्जुन डांगळे, डॉ. धेंडे, ॲड. चव्हाण यांचेही भाषण झाले. समारंभात ॲड. प्रमोद आडकर आणि रंजना भोसले यांना संविधानरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. संविधान जागर सप्ताहाच्यानिमित्ताने संविधान कट्टा, संविधान दौड आणि संविधान वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संविधानदिनी पुण्यातील पाच लाख नागरिक संविधानाचे वाचन करणार असल्याचे परशुराम वाडेकर यांनी या सप्ताहामागची भूमिका स्पष्ट करताना सांगितले.

संविधानाला जपा - सबनीस
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, ‘‘भारतीय संविधान हा तोडणारा नव्हे, तर समाजाला जोडणारा ग्रंथ आहे, त्यामुळे या ग्रंथाला प्रत्येकाने काळजापेक्षाही अधिक जपणे गरजेचे आहे. काही धर्मांध राजकीय पक्ष हे हिंदू राष्ट्राच्या नावाखाली या ग्रंथाला तोडण्याची भाषा करू लागले आहेत. त्यांचा तो डाव हाणून पाडण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे.’’ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com