कचरा डेपोप्रश्‍नी तोडगा नाही

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

पालिकेच्या शिष्टमंडळाची भेट; ग्रामस्थांचा चर्चेला नकार

फुरसुंगी - महापौरांसह अतिरिक्त आयुक्त आणि लोकप्रतिनिधींनी आज दुपारी डेपोविरोधी आंदोलन करणाऱ्या उरुळी देवाची आणि फुरसुंगीच्या ग्रामस्थांशी चर्चा केली. डेपो हटविण्यासाठी वेळ द्या आणि डेपोत पालिकेला कचरा टाकू द्या, अशी पालिकेने केलेली विनंती ग्रामस्थांनी धुडकावून लावली.

‘दिलेली आश्‍वासने कधीही न पाळल्याने कोणतीही चर्चा करायची नसून, एकही कचरागाडी डेपोत येऊ देणार नाही,’ असेही ग्रामस्थांनी पालिकेच्या शिष्टमंडळाला सुनावले.

उरुळी देवाची आणि फुरसुंगीच्या ग्रामस्थांनी शुक्रवार (ता. २१) पासून महापालिकेच्या कचरागाड्या अडवत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्‍वभूमीवर महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर नवनाथ कांबळे, प्रभारी आयुक्त राजेंद्र जगताप, आमदार योगेश टिळेकर, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, शिवसेना गटनेते संजय भोसले यांच्यासह नगरसेवकांनी आंदोलक ग्रामस्थांशी चर्चा केली. ग्रामस्थांच्या वतीने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, कचरा डेपो हटाव संघर्ष समिती अध्यक्ष भगवान भाडळे, राहुल शेवाळे, दोन्ही गावांचे सरपंच उपस्थित होते. 

पालिका अधिकाऱ्यांनी चर्चेस सुरवात करताच संतप्त ग्रामस्थांनी चर्चा करायची नाही, असे सुनावले. अखेर चर्चेतूनच मार्ग काढू, असे म्हणत महापौरांनी चर्चेला सुरवात केली. 

महापौर म्हणाल्या, ‘‘अनेक वर्षांपासून तुम्ही हा त्रास सहन करत आहात. यापुढे येथे थोडाही ओला कचरा टाकणार नाही. कचरा डेपोसाठी नवीन जागा लवकरच ताब्यात मिळेल. शहरात काही ठिकाणी कचरा प्रकल्प सुरू झाले आहेत. आमचे आणखीही प्रयत्न सुरू आहेत. परंतु हा प्रश्‍न सोडविण्यास वेळ लागणार आहे.’’ परंतु ग्रामस्थांनी कठोर भूमिका घेतल्याने कुठलाही तोडगा न निघता बैठक संपली व पालिका शिष्टमंडळ रिकाम्या हातानेच माघारी फिरले.

दहा मिनिटे उभे राहणे अशक्‍य 
बैठक संपल्यावर पालिकेचे शिष्टमंडळ आग लागलेल्या ठिकाणाची आणि डेपोची पाहणी करण्यासाठी गेले; मात्र रणरणते ऊन, दुर्गंधी, धूर यामुळे कुणीही डेपोपर्यंत गेले नाही. डेपोच्या प्रवेशद्वाराशेजारील छोट्या खोलीत थोडावेळ थांबून परत आले. यावर ग्रामस्थ भडकले आणि म्हणाले, ‘‘आम्ही पंचवीस वर्षे याच वातावरणाचा सामना करत आहोत; मात्र यांना दहा मिनिटेही तिथे उभे राहवत नाही.’’

Web Title: no option garbage depo