कर्वे रस्त्यावर नो पार्किंग 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

पुणे - वर्दळीच्या कर्वे रस्त्यावर मेट्रोमार्गाचे खांब उभारण्याचे काम येत्या शुक्रवारपासून (ता. 6 एप्रिल) सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात गरवारे महाविद्यालयापासून या कामाला सुरवात होणार आहे. कर्वे रस्त्यावर तूर्त वाहतुकीत बदल न करता काम सुरू करण्यात येणार आहे, असे महामेट्रोने स्पष्ट केले आहे. काम सुरू झाल्यावर एसएनडीटी ते गरवारे महाविद्यालय रस्ता दरम्यान दोन्ही बाजूला नो पार्किंग राहणार आहे. 

शहरातील सर्वाधिक वाहतूक असलेल्या कर्वे रस्त्यावर मेट्रोचे खांब उभारण्याचे काम सुरू करण्यापूर्वी पदपथांची लांबी- रुंदी आवश्‍यकतेनुसार कमी करण्यात आली आहे. तसेच, नागरिकांना नो पार्किंगची माहिती देणारे फलक महापालिकेने उभारले आहेत. या रस्त्यावर बॅरिकेडिंग केल्यावर वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिस असतीलच. त्याशिवाय महामेट्रोतर्फे वॉर्डनही नियुक्त करण्यात आले आहेत, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली. या रस्त्यावर मेट्रो मार्गासाठी किमान 8 ते 10 खांब उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी पाया खोदणे, खांब उभारणे आणि त्यावर सिमेंटचे गर्डल टाकणे आदी प्रक्रिया होणार आहे. सुमारे दीड ते दोन वर्षांत हे काम पूर्ण होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवून मेट्रो मार्गाचे काम सुरू ठेवण्यात येणार आहे. फक्त एसएनडीटीजवळ काम सुरू करताना चक्राकार एकेरी वाहतूक करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

कर्वे रस्त्यावर 6 एप्रिलपासून होणार 
- एसएनडीटी महाविद्यालय ते गरवारे महाविद्यालयादरम्यान रस्त्यावर मध्यभागात मेट्रो मार्गाचे खांब 
- रस्त्याच्या मध्य भागात खांब उभारण्यासाठी 9 मीटर रुंदीचे बॅरिकेडिंग उभारण्यात येईल 
- या रस्त्यावर वाहतुकीसाठी दोन्ही बाजूला प्रत्येकी 7.5 मीटरचा रस्ता उपलब्ध असेल 
- एसएनडीटी ते गरवारे महाविद्यालय रस्ता दरम्यान दोन्ही बाजूला नो पार्किंग असेल 
- चक्राकार वाहतुकीचा प्रयोग 10 मे नंतर होऊ शकेल 
- नळ स्टॉप चौकातील दुहेरी उड्डाण पुलाचे कामही 10 मे पासून सुरू होईल 

Web Title: No parking on the Karve road