भ्रष्टाचाराबाबत ‘नो टॉलरन्स’ - श्रावण हर्डीकर

भ्रष्टाचाराबाबत ‘नो टॉलरन्स’ - श्रावण हर्डीकर

पिंपरी - ‘प्रशासकीय गतिमानता, कार्यक्षमता, व्यावसायिकता आणि पारदर्शकता म्हणजेच ‘गुड गव्हर्नन्स’ यावर माझा भर राहील. ठराविक वेळेत काम पूर्ण करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना सामूहिकरीत्या नव्हे तर वैयक्तिकरीत्या जबाबदार धरले जाईल. 

भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही. तसे प्रकार घडल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रारी द्याव्यात. भीती बाळगू नये. काही चुकीचे घडत असल्यास थेट माझ्याकडे या’’, असे नूतन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गुरुवारी स्पष्ट केले. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे श्रावण हर्डीकर यांनी गुरुवारी सकाळी स्वीकारली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील भूमिका स्पष्ट केली. सहायक आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यावेळी उपस्थित होते. 

हर्डीकर म्हणाले, ‘‘प्रशासकीय कामे कार्यक्षम आणि गुणवत्तापूर्वक पूर्ण करणे हे माझे मुख्य धोरण राहील. पालिकेच्या विविध प्रकल्पांची वेळेत आणि परिणामकारक अंमलबजावणी करणे यावरदेखील माझा भर राहील. सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने मेट्रो हा प्रमुख भाग आहे. परंतु ‘बीआरटी’, ‘पीएमपी’ बसेस यासह इतर घटकांचाही एकात्मिकपणे विचार करून प्रदूषण नियंत्रणासाठी हरित वाहतूक(ग्रीन ट्रान्स्पोर्ट)ला चालना दिली जाईल.

‘पार्किंग धोरण’ निश्‍चित केले जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ‘हॉकर्स झोन’ तयार करून पथारीवाले, हातगाडी चालक यांचे नियोजन केले जाईल.’’

पिंपरी-चिंचवड हे झपाट्याने विकसित होणारे शहर असल्याचे सांगून हर्डीकर म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड शहराची ‘स्मार्ट सिटी’कडे उशिराने वाटचाल चालू झाली. परंतु, आता ‘स्मार्ट सिटी’बरोबरच सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने राहणीमान आणि घरांच्या परवडणाऱ्या किमतीबाबतही विचार करावा लागेल. सर्व समाजघटकांचा विचार करून शहराला दिशा देण्याचा प्रयत्न राहील.’’

आयुक्त म्हणाले... 
- व्यापक जनसंवाद आणि निरनिराळ्या सोयी-सुविधा देण्यावर भर 
- नागपूर येथील ‘ग्राउंड फिल्ड’च्या धर्तीवर नगररचनेचा विचार
- डॉ. श्रीकर परदेशी यांची ‘सारथी’ योजना पुढे नेणार
- गहाळ फायलीचे प्रकरण तपासून पाहिले जाईल
- नवीन अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी बांधकाम परवानगी सुलभतेने देणार
- ‘स्मार्ट सिटी’च्या निमित्ताने ‘सिटी ब्रान्डिंग’ केले जाईल

‘‘जितके पकडून द्याल...तेवढे चांगले !
पालिकेचे अधिकारी-कर्मचाऱ्यांची प्रकरणे बाहेर येत असल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले असता ‘‘फाईल्सवर त्वरित निर्णय झाल्यास ‘बाबू’ पाचर मारणार नाही. जेवढे भ्रष्टाचारी पकडले जातील तेवढी इतरांवर जरब बसेल’’, असेही हर्डीकर यांनी नमूद केले. 

सायकल भ्रमंती डोळे उघडते...
नागपूर येथे आयुक्त असताना हर्डीकर हे सायकलवरूनही फेरफटका मारत असत. त्याची आठवण करून दिली असता ते म्हणाले, ‘‘सायकल प्रवासाने तंदुरुस्ती टिकून राहते. परंतु, सोबतच अनेक ‘गंध’ही कळतात. ‘सायकलिंग’ हे डोळे उघडणारे ठरते.’’

नूतन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा परिचय...
श्रावण हर्डीकर हे २००५ च्या बॅचचे ‘आयएएस’ अधिकारी आहेत. त्यांचे शिक्षण बी.ई. झाले असून, त्यांनी ‘आयएएस’च्या परीक्षेत राज्यात प्रथम तर देशात सातवा क्रमांक मिळविला. २०१५ ते २०१७ या काळात त्यांनी नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळली. तत्पूर्वी ते राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. २०११-१२ मध्ये यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नंदूरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, रत्नागिरी, दापोली, कोल्हापूर येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. २०११-१२ या वर्षासाठी त्यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून गौरविण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com