पिंपरी शहरात यंदा पाणीकपात नाही 

ज्ञानेश्‍वर बिजले
गुरुवार, 10 मे 2018

पिंपरी - पवना धरणात ३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, तो जुलैअखेरपर्यंत पुरेल. गेल्या वर्षी मेमध्ये शहरात दिवसाआड पाणीपुरवठा झाला होता. या वर्षी मात्र शहरातील पाणीपुरवठ्याबाबत सध्यातरी तक्रारी मोठ्या प्रमाणात आलेल्या नाहीत. त्यामुळे यंदा पाणीकपात करण्यात येणार नाही.

पिंपरी - पवना धरणात ३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, तो जुलैअखेरपर्यंत पुरेल. गेल्या वर्षी मेमध्ये शहरात दिवसाआड पाणीपुरवठा झाला होता. या वर्षी मात्र शहरातील पाणीपुरवठ्याबाबत सध्यातरी तक्रारी मोठ्या प्रमाणात आलेल्या नाहीत. त्यामुळे यंदा पाणीकपात करण्यात येणार नाही.

महापालिकेची वितरण व्यवस्था योग्य नसल्यामुळे पाणीपुरवठ्याविषयी अनेकदा तक्रारी येतात. गेल्या वर्षी दोन मेपासून जूनअखेरपर्यंत दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्या वेळी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्याचे पडसाद उमटले. राजकीय पक्षांनी आंदोलनेही केली. टॅंकर लॉबीकडून पाणीपुरवठ्यासाठी जादा रक्कम आकारल्याच्याही नागरिकांच्या तक्रारी होत्या. 

या पार्श्‍वभूमीवर, सध्या जलसंपदा विभागाकडून रोज पाचशे दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी, तसेच एमआयडीसीकडून ३० एमएलडी पाणी घेण्यात येत आहे. प्रभागातील समस्या सोडविण्यावर आयुक्त व पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी गेले वर्षभर भर दिला. त्यामुळे सर्व ठिकाणी गरजेइतका पाणीपुरवठा सुरू आहे. 

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘‘यंदा मोठ्या प्रमाणात तक्रारी नाहीत. स्थानिक परिसरातील तक्रारींचे प्रमाण खूप आहे. त्यांचे निवारण केले जाते. मे महिन्याचे तीन आठवडे शिल्लक आहेत. तोपर्यंत याच पद्धतीने सुरळीत पाणी पुरविण्याचे नियोजन केले आहे. सध्या शहरातील पाणीपुरवठा समतोल म्हणजे थिनली बॅलन्स आहे. खंडित वीजपुरवठा अथवा टाकी कमी भरल्याची थोडी जरी अडचण आली, तरी त्या भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. तो सुरळीत करताना अन्य भागांवर परिणाम होतो. आंद्रा धरणातून १०० एमएलडी पाणी मिळण्यासाठी फेरप्रस्ताव पाठविला आहे. ते पाणी मिळू लागताच शहराची पाणी समस्या सुटेल.’’

Web Title: No water crisis in Pimpri city