पिंपरी-चिंचवड शहरात पाणी दरवाढ नाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत पाणीपट्टीत कोणतीही दरवाढ करायची नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका स्थायी समिती सभेने बुधवारी (ता. ५) घेतला. प्रशासनाने ठेवलेला दरवाढीचा प्रस्ताव दफ्तरीदाखल केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

पिंपरी - शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत पाणीपट्टीत कोणतीही दरवाढ करायची नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका स्थायी समिती सभेने बुधवारी (ता. ५) घेतला. प्रशासनाने ठेवलेला दरवाढीचा प्रस्ताव दफ्तरीदाखल केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

समन्याय पद्धतीने पाणी वितरणासाठी सध्या शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, उंच भागातील नागरिकांना कमी व उताराच्या भागातील नागरिकांना जादा पाणी मिळत असल्याने पाण्याचा अपव्यय वाढला आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पाणीपट्टीत वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समिती सभेसमोर ठेवला होता. मात्र, समितीने एकमताने निर्णय घेत दरवाढीचा प्रस्ताव दप्तरी दाखल केला. त्यामुळे चालू दराप्रमाणेच नागरिकांना पाणीपट्टी भरावी लागणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या घरगुती वापरासाठी दरमहा सहा हजार लिटरपर्यंत मोफत पाणी दिले जात आहे. सहा हजार ते २० हजार लिटरपर्यंत चार रुपये २० पैसे प्रतिहजार लिटरने; तर २० हजार लिटरच्या पुढे आठ रुपये ४० पैसे प्रतिहजार लिटरसाठी पाणीपट्टी आकारणी केली जात आहे. झोपडपट्टीतील नळजोडधारकांना मात्र सध्या सहा हजार लिटरपर्यंत मोफत पाणी दिले जाते. सहा हजार ते १५ हजार लिटरपर्यंत दोन रुपये १० पैसे प्रतिहजार लिटरने; तर १५ ते २० हजार लिटरसाठी तीन रुपये १५ पैसे प्रतिहजार लिटरसाठी पाणीपट्टी आकारणी केली जात आहे. 

पुणे : डल्ला'बाज टोळीपासून सावधान; अशी केली जातेय हातचलाखी

असा होता प्रस्ताव
प्रस्तावित दरानुसार सहा हजार लिटरपर्यंत मोफत पाणी मिळणार होते. मात्र, सहा ते १५ हजार लिटरपर्यंत आठ रुपये, १५ ते २० हजार लिटरपर्यंत ४० रुपये आणि २० हजार लिटरच्या पुढील पाणीवापरासाठी प्रतिहजार लिटरसाठी शंभर रुपये पाणीपट्टी आकारली जाणार होती. प्रस्तावित दरानुसार झोपडपट्टीसाठी सहा हजार लिटरपर्यंत मोफत पाणी मिळणार होते. मात्र, सहा ते १५ हजार लिटरपर्यंत चार रुपये, १५ ते २० हजार लिटरपर्यंत ४० रुपये आणि २० हजार लिटरच्या पुढील पाणीवापरासाठी प्रतिहजार लिटरसाठी १०० रुपये पाणीदर आकारण्याचा प्रस्ताव होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No water tax increase in pimpri chinchwad city