पिंपरी-चिंचवडकरांची पाण्याची चिंता मिटली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. सध्या पवना धरणात ९० टक्‍के पाणीसाठा झाल्याने शहरवासीयांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. सध्या पवना धरणात ९० टक्‍के पाणीसाठा झाल्याने शहरवासीयांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.

पवना धरणाची एकूण क्षमता १०.६८ टीएमसी आहे. त्यापैकी ८.५ टीएमसी हा जिवंत साठा आहे. यापैकी पाच टीएमसी पाण्याचा वापर पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्याकरिता होतो. पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या २२ लाखांपेक्षा अधिक आहे. तर, नळजोडांची संख्या एक लाख ४१ हजार इतकी असून, ४९० एमएलडी पाण्याचा वापर शहराच्या पाणीपुरवठ्याकरिता केला जातो. पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहरासह तळेगाव, देहूरोड, वाघोली प्रकल्प यांनाही पाणीपुरवठा होतो. तसेच शेतीसाठीदेखील पवना नदीतील पाण्याचा उपयोग होतो. पावसाळ्यातील चार महिने पावसाचे पाणी पवना नदीतून घेतले जाते. उर्वरित आठ महिने पवना धरणातून पाणी सोडले जाते. या सर्व योजनांना दरमहा धरणातील दहा टक्‍के पाणीसाठा लागतो. सध्या धरण ९० टक्‍के भरले असल्याने पिंपरी-चिंचवडकरांच्या वर्षभराची पाण्याची चिंता आता मिटली आहे.

गेल्या आठ दिवसांपासून सध्या धरण परिसरात २० ते ३० मिलिमीटर पाऊस पडत आहे. यामुळे धरण पाणीसाठ्यात दररोज किंचितशी वाढ होत आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास येत्या दोन-तीन दिवसांत धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जाईल, पवना धरणाचे शाखा अधिकारी ए. एम. गदवाल यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. मात्र, पावसाचा जोर वाढल्यास धरणातून पाणी सोडण्याबाबत त्वरित निर्णय घेतला जाईल. मात्र, पाणी सोडण्यापूर्वी चार तास अगोदर सर्व संबंधितांना कळविण्यात येईल, असेही ते म्हणाले.

Web Title: No Water tension to Pimpri-Chinchwad Citizen