मॉस्कोला जाणारे 'ते' पार्सल गेले कोठे?

अनिल सावळे
Wednesday, 16 September 2020

-मॉस्कोला जाणारे पार्सल गेले कोठे? 
-पोस्टाच्या पार्सल विभागाचा अजब कारभार, पार्सल न मिळाल्याने पालक त्रस्त 

पुणे : रशियातील मॉस्को शहरात मुलगी वैद्यकीय शिक्षण घेतेय. तिच्यासाठी पीठ, डाळी, कडधान्ये, तिखट आणि रेडी कुक पदार्थांचे पार्सल सहा जुलैला स्पीड पोस्टाने मॉस्कोला पाठवले. स्पीड पोस्टसाठी 12 हजार रुपये खर्च केले. परंतु आठ दिवसांत पोचणारे पार्सल अडीच महिने उलटूनही मुलीच्या हाती पडले नाही. गेली दोन महिने पाठपुरावा करतोय. पोस्टात विचारणा केल्यास "आमच्या हातात काही नाही. तुमचे एकट्याचेच पार्सल नव्हे, अशा बऱ्याच तक्रारी आहेत,' असे उत्तर कर्मचाऱ्याकडून मिळाले. मुलीचे वडील अतुल शेजवळ सांगत होते. या घटनेवरून पोस्टाच्या पार्सल विभागाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परदेशात शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींना त्यांचे पालक पुण्यातून खाद्यपदार्थांचे पाठवित असतात. मॉस्कोत आपल्यासारखे धान्य मिळत नाही. त्यामुळे पैसे गेले तरी चालतील पण चांगले खाण्यास मिळावे, हा उद्देश. त्यासाठी शेजवळ यांनी साधू वासवानी चौकातील जीपीओ कार्यालयातून धान्य, खाद्यपदार्थांचे पार्सल पाठवले. त्यापेक्षा स्पीड पोस्टाचा खर्चच जास्त. स्पीड पोस्टने पार्सल आठ दिवसांत मिळेल, असे पोस्टातील कर्मचाऱ्याने सांगितले. मात्र, आजही मॉस्कोला पाठविण्यात आलेले ते पार्सल रस्त्यात कोठे अडकले, याचा पत्ता नाही. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रशियात खाद्यपदार्थांचे पार्सल पाठविणे बंद आहे की नाही, याचे उत्तर कर्मचाऱ्यांकडे नाही. 

पोस्टात विचारणा केल्यानंतर ऑनलाइन तक्रार करा, असे सांगण्यात आले. त्यामुळे ऑनलाइन तक्रार केली. ट्रॅक तपासला असता मुंबईच्या पुढे ट्रॅक दिसत नाही. पार्सल नेमके मुंबईत, दिल्लीत की मॉस्कोत हे समजत नाही. काही खाद्यपदार्थाची गॅरंटी राहिली नाही. मुलीनेही मॉस्कोतील कार्यालयात चौकशी केली. पण तेथेही पार्सल पोचले नाही. पुण्यासह इतर शहरातीलही बऱ्याच पालकांची ही तक्रार आहे. खाद्यपदार्थ साहित्यांचे पार्सल मुलांना कधी भेटणार, असा प्रश्‍न पालकांकडून विचारण्यात येत आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तो होऊ शकला नाही. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पाठपुरावा करून तुम्हाला कळवू- 
आम्ही दोन महिने झाले चौकशी करतोय पण पोस्टातील कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थित उत्तर मिळत नाही. पाठपुरावा करून तुम्हाला कळविण्यात येईल, मुंबई एअरपोर्टला चौकशी करून सांगतो, असे उत्तर पार्सल विभागाकडून दिले जाते, असे अतुल शेजवळ यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: non-management of parcel department