राजकारण म्हणून नव्हे, राष्ट्रकारणासाठी कार्यरत - जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

राजकारण म्हणून नव्हे, तर राष्ट्रकारण म्हणून हे पद मी स्वीकारले. या क्षेत्रामधून मला राष्ट्रसेवा करता यावी, यासाठी हे क्षेत्र निवडले, असे मत खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी व्यक्त केले. सर्व लिंगायत समाजाला एकत्र करून ओबीसी प्रमाणपत्रासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोथरूड - राजकारण म्हणून नव्हे, तर राष्ट्रकारण म्हणून हे पद मी स्वीकारले. या क्षेत्रामधून मला राष्ट्रसेवा करता यावी, यासाठी हे क्षेत्र निवडले, असे मत खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी व्यक्त केले. सर्व लिंगायत समाजाला एकत्र करून ओबीसी प्रमाणपत्रासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वीरमाहेश्वर जंगम व वीरशैव लिंगायत समाज, पुणे यांच्यावतीने सोलापूर जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार डॉ. शिवाचार्य महास्वामी यांचा सत्कार एरंडवणा येथील श्‍यामराम कलमाडी कॉलेजमध्ये झाला. या वेळी श्री क्षेत्र काशी पीठाचे डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, डॉ. निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज, महादेव शिवाचार्य वाईकर महाराज, गंगाधर शिवाचार्य औंधकर महाराज, गुरुसिद्ध मणिकंठ दहीवडकर महाराज, आमदार मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, महापौर मुक्ता टिळक, वीर माहेश्वर जंगम संस्थेचे अध्यक्ष महेश कुगावकर आणि संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी मदतनिधी गोळा करण्यात आला. 

कुलकर्णी म्हणाल्या, ‘एक योगी, एक महाराज हे राजकारणात कसे जाऊ शकतात, असे प्रश्न निर्माण होऊन अनेकांच्या भुवया उंचावल्या; परंतु अशा योगी, महाराजांनीच सत्ता हाती घेण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे.

देशाची प्रगती करण्याची क्षमता अध्यात्मामध्ये आहे. अध्यात्मिक ताकद वाढल्याशिवाय देशाची सेवा करण्याची ताकद निर्माण होणार नाही.’ श्री क्षेत्र काशी पीठाचे डॉ. शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले, ‘राजसत्ता सोबत असेल तर आपण काही करू शकतो. आपण सर्व लिंगायत समाजाने एकत्र येणे गरजेचे आहे. समाजाच्या ओबीसी प्रमाणपत्राविषयी मागणीसाठीदेखील सर्वांनी सरकारला बरोबर घेऊन एकत्र काम करू.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Not for politics, but for nationalism Jaysiddheshwar swami