Vidhan Sabha 2019 :..म्हणून मतदारांची 'नोटा'लाच पसंती!

अजित घस्ते
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

आंबील ओढ्याला पूर आल्याने सहकारनगर भागातील टांगेवाला कॉलनी, अरण्येश्वर, संतनगर, अण्णाभाऊ साठे वसाहत, शिवदर्शन या भागातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात घराचे नुकसान झाले.

सहकारनगर : आंबील ओढ्याला पूर आल्याने सहकारनगर भागातील टांगेवाला कॉलनी, अरण्येश्वर, संतनगर, अण्णाभाऊ साठे वसाहत, शिवदर्शन या भागातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात घराचे नुकसान झाले. यामध्ये टांगेवाला कॉलनी येथील नागरिकांची जीवितहानीबरोबर वित्तहानी झाल्याने नागरिकांचा 'तोटा' झाल्याने नागरिकांनी मतदानावर नाराजी व्यक्त केली.

एक महिना झाला तरी नागरिक पूर परिस्थितीमध्ये जीवन जगत आहेत. यामुळे पर्वती मतदारसंघातील निवडणुकीत आज सोमवारी मतदानावर काही नागरिकांनी बहिष्कार टाकला तर काही नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत 'नोटा' ला मतदान केले. यावेळी नागरिकांनी संताप व्यक्त करीत प्रतिक्रिया दिल्या.

चंदन भोडेकर (टांगेवाला कॉलनी) म्हणाले, टांगेवाला कॉलनीत आमचे तीन परिवारात असून, एकूण 17 मतदान आहे. यामध्ये आई-वडील, बहिण-भाऊ, मामा-मामी, मावशी असे एकूण 17 मतदान आहे. पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे शासकीय मदत पंधरा हजार मदत मिळाली. मात्र, यामध्ये घर काम करायचे की अन्नधान्य भरणार असा प्रश्न आहे? सध्या आम्ही एक महिना झाला तरी दिवसा रस्त्यावर तर रात्री नातेवाईकांच्या घरी राहून दिवस काढत आहे. यामुळे आम्ही मतदानवर बहिष्कार केला आहे.

कैलास जाधव म्हणाले, पूरपरिस्थितीमुळे आमच्या घराचे मोठे नुकसान झाले. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मतदानाचा अधिकार बजावत 'नोटा 'ला मतदान केले आहे. 
यावेळी बबन अडसूळ (अण्णा भाऊ साठे वसाहत) म्हणाले, संविधानानी मतदानाचा अधिकार दिला असल्याने मतदानाचा हक्क बजावणे, आपले कर्तव्य आहे. नाल्या कडेला असलेल्या अरण्येश्वर येथील अण्णा भाऊ साठे वसाहत येथील नागरिकांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, अजून नागरिकांना मदत मिळाली नाही म्हणून काही नागरिकांनी मतदानावर बहिष्कार केला असून, काही नागरिकांनी नोटा मतदान केले आहे. मी स्वतः नोटाला मतदान केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NOTA Voters increasing in Election Maharashtra Vidhan Sabha 2019