चेक द्या, हजार-पाचशेच्या नोटा नको 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

पुणे - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रुग्णालयात स्वीकारल्या जात नसल्याने रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे. रुग्णालयातून घरी सोडणाऱ्या रुग्णांबाबत सुटे पैसे ही डोकेदुखी ठरल्याचेही दिसून येत आहे. हजार-पाचशेच्या नोटा वगळून कोणत्याही प्रकारे बिल स्वीकारण्याची तयारी खासगी रुग्णालयांनी केली असल्याचीही माहिती पुढे आली आहे. 

पुणे - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रुग्णालयात स्वीकारल्या जात नसल्याने रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे. रुग्णालयातून घरी सोडणाऱ्या रुग्णांबाबत सुटे पैसे ही डोकेदुखी ठरल्याचेही दिसून येत आहे. हजार-पाचशेच्या नोटा वगळून कोणत्याही प्रकारे बिल स्वीकारण्याची तयारी खासगी रुग्णालयांनी केली असल्याचीही माहिती पुढे आली आहे. 

सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांनीदेखील पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकाराव्यात, असे आदेश राज्याच्या आरोग्य खात्याने काढले आहेत. त्यामुळे या नोटा घेऊन बिल भरणाऱ्यांची भली मोठी रांग रुग्णालयातील काउंटर पुढे लागल्याचे सोमवारी सकाळी दिसून आले. यातील बहुतांश रुग्णांच्या नातेवाइकांनी रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी हजार आणि पाचशेच्या नोटा आणल्या होत्या. पण, रुग्णालय प्रशासनाकडून त्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याची तक्रार या नातेवाइकांनी केली. 

शहरातील इतर मोठ्या रुग्णालयांमधूनही सामान्य रुग्णांचे बिल या नोटांच्या माध्यमातून स्वीकारले जात नाही. मात्र, काही रुग्णालयांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनी केल्यानंतर या नाकारलेल्या नोटा तातडीने घेऊन रुग्णाचे बिल जमा करून घेतल्याच्या घटनाही पुढे आल्या आहेत. 
याबाबत रुग्णाचे नातेवाईक प्रसाद पंडित म्हणाले, ""खासगी रुग्णालयांनाही पाचशे-हजार रुपयांच्या नोटा घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती टीव्हीवरच्या बातम्यांमधून दिली जात आहे. मात्र, प्रत्यक्षात रुग्णालयांमधून या नोटा स्वीकारल्या जात नाहीत. रुग्णालयाचे पैसे भरण्यासाठी या नोटा बॅंकेतून 8 नोव्हेंबरपूर्वीच काढल्या होत्या. आता नोटा बदलण्यासाठी बॅंकेत गर्दी आहे, तर रुग्णालयात त्या घेतल्या जात नाहीत, अशी अवस्था निर्माण झाली आहे.'' 

रद्द केलेल्या नोटा स्वीकारण्याबाबत रुग्णालयांना कोणत्याही प्रकारची सूचना सरकारकडून आलेली नाही. या नोटा स्वीकारल्या तर बॅंक त्या भरून घेत नाहीत. त्यामुळे पाचशे-हजारच्या नोटा वगळता क्रेडिट, डेबिट, ऑनलाइन पेमेंट, चेक किंवा अगदी पोस्ट डेटेड चेकच्या माध्यमातून बिल स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. 
- डॉ. चंद्रशेखर कर्वे, मुख्याधिकारी, जोशी रुग्णालय 

Web Title: notes are not accepted in the hospital