नोटांचा रंग बदलला; गरिबीचा अजून तसाच आहे... 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

प्रेक्षकांनी प्रोत्साहन दिले, त्यामुळेच "सचिन पिळगावकर' ही ओळख तयार झाली. आजवरच्या प्रवासात महाराष्ट्राइतकी साथ दुसरी कोणी दिली नाही. 
- सचिन पिळगावकर, अभिनेते 

पुणे  - 
चलनातल्या नोटा बदलल्या, 
पण पोटातला खड्डा अजून तसाच आहे... 
नोटांचे रंग बदलले, 
पण गरिबीचा रंग अजून तसाच आहे... 

अशा वेगवेगळ्या रचनांमधून राज्याच्या कानाकोपऱ्यातील कवींनी वेदनेवर बोट ठेवले. प्रत्येक रचना लोकांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित होती. त्यामुळे श्रोत्यांनी प्रत्येक रचनेला भरभरून दाद दिली. 

यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त प्रकाश ढेरे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने आयोजित कवी संमेलनात ही अनुभूती आली. या वेळी संस्थेचा "जीवन-कलागौरव' पुरस्कार अभिनेते सचिन पिळगावकर यांना महापौर प्रशांत जगताप आणि आमदार जयदेव गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कवी वीरधवल परब (मम म्हणा फक्त), कवी साहेबराव ठाणगे (पाऊस पाणी), कवी डी. के. शहा (दंगल आणि इतर कविता) यांना साहित्य पुरस्काराने गौरवण्यात आले. "वात्रटिका'कार रामदास फुटाणे, अभिनेते श्रीकांत मोघे, संस्थेचे विश्‍वस्त संजय ढेरे आदी उपस्थित होते. 

काळा पैसा परत आणायचा 
वायदा झाला खोटा, 
परक्‍याची तिजोरी उघडता आली नाही म्हणून 
घरातल्याच बंद केल्या नोटा, 

अशी रचना सादर करून कवी भरत दौंडकर यांनी "नोटाबंदी'वर भाष्य केले. अनिल दीक्षित यांनीही नोटाबंदी या विषयावर विडंबन गीत सादर केले. "झिंग झिंग झिंगाट...' या गाण्यातून अचानक झालेल्या "नोटाबंदी'मुळे कुटुंबात उडालेली धांदलच त्यांनी मांडली. बालिका बिटले आणि हर्षदा सौरभ यांनी वेगळ्या नजरेतून टिपलेले "बाईचे जगणे' अनेकांच्या मनाला स्पर्शून गेले. अच्छे दिन, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, राज्यकर्त्यांची बेताल वक्तव्य, बदलते राजकारण असे अनेक विषय घेऊन सादर झालेल्या कवितांच्या या मैफलीत श्रोते गुंतत गेले. 

Web Title: Notes changed color; Poverty is still the same