जुन्नर तालुक्यातील 7 पतसंस्थांना नोटीस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

जुन्नर - लोकसेवा बॅंकेत गुंतवणूक केल्याबद्दल जुन्नर तालुक्‍यातील सात नागरी सहकारी पतसंस्थाना सहाय्यक निबंधक यशवंती मेश्राम यांनी खुलासा मागणी करणारे पत्र दिले आहे. 

अवसायनात निघालेल्या या बॅंकेत ठेवी ठेवण्यापूर्वी सहाय्यक निबंधकांची पूर्वपरवानगी घेतली होती का? अशी विचारणा या पत्रात करण्यात आली आहे.

जुन्नर - लोकसेवा बॅंकेत गुंतवणूक केल्याबद्दल जुन्नर तालुक्‍यातील सात नागरी सहकारी पतसंस्थाना सहाय्यक निबंधक यशवंती मेश्राम यांनी खुलासा मागणी करणारे पत्र दिले आहे. 

अवसायनात निघालेल्या या बॅंकेत ठेवी ठेवण्यापूर्वी सहाय्यक निबंधकांची पूर्वपरवानगी घेतली होती का? अशी विचारणा या पत्रात करण्यात आली आहे.

जिल्हा सहकारी बॅंकेव्यतिरिक्‍त अन्य बॅंकेत ठेव ठेवताना निबंधकाची परवानगी घेतली होती का? तसेच यामुळे कायदा व नियमांचे उल्लंघन झाले का? याबाबत लेखा परीक्षकांनी दोष असल्याचा आक्षेप नोंदविला आहे का? अशी विचारणा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ८७ पतसंस्थांनी सुमारे ११५ कोटी रुपयांची ठेव लोकसेवा बॅंकेत ठेवली आहे. यात जुन्नर तालुक्‍यातील अकरा पतसंस्थांच्या ३७ कोटींच्या ठेवींचा समावेश असल्याचे समजते. या प्रकरणी पूर्वपरवानगी घेऊन ठेवी ठेवल्या आहेत का? अशी विचारणा करून कारवाईचे संकेत सहकार खात्याने दिले. मात्र ज्यांनी बॅंक अवसायनात काढली त्यांच्याविरोधात सहकार खात्याने कोणतीच ठोस कारवई केली नसल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे सहकार खात्याने पतसंस्थांचे पैसे परत करण्यासाठी प्रयत्न करावयाचे सोडून त्यांनाच उलट विचारणा केली असल्याचे मतदेखील व्यक्‍त करण्यात येत आहे. 

चोर सोडून संन्याशाला फाशी
लोकसेवा बॅंकेचा व्याजदर इतर सहकारी बॅंकेपेक्षा अधिक असल्याने सहकारी पतसंस्थानी आपली गुंतवणूक केली. पतसंस्थेच्या अहवालात लोकसेवा बॅंकेत ठेवी ठेवल्याबद्दल कोणताही आक्षेप लेखा परीक्षक तसेच सहकार विभागाच्या कार्यालयाकडून घेण्यात आला नसल्याचे वल्लभ पतसंस्थेचे अध्यक्ष सी. बी. गांधी यांनी स्पष्ट केले. या बॅंकेच्या गैरव्यवहाराबाबत संचालक मंडळाच्या मालमत्तेची जप्ती करणे, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करणे तसेच ठेवीदारांचे पैसे वसूल करणे याकामी सहकार्य करण्याऐवजी बॅंकेत ठेवी ठेवल्याबद्दल कारवाई करणे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी असा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सहकार खात्याच्या १२ नोहेंबर २००८च्या परिपत्रकानुसार शेड्यूल्ड बॅंका अथवा नागरी सहकारी बॅंकात गुंतवणूक करण्यास अनुमती दिली आहे. त्याप्रमाणे ‘अ’ वर्ग असणारी व शून्य टक्के एनपीए असणाऱ्या लोकसेवा बॅंकेत गुंतवणूक करण्यात आली.
- सी. बी. गांधी, संस्थापक अध्यक्ष, वल्लभ पतसंस्था

Web Title: notice to 7 credit society in junnar tahsil