हाउसिंग सोसायट्यांना नोटिसा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

लेखापरीक्षणाचा अहवाल न देणाऱ्या सहकारी हाउसिंग सोसायट्यांनी त्याची तत्काळ पूर्तता करावी, या संदर्भात त्यांना फेब्रुवारी महिन्यामध्येच नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. लेखापरीक्षणाचा अहवाल न दिल्यास त्यांच्यावर अवसायनाची कारवाई करण्यात येईल. 
- उज्ज्वला माळशिकारे, उपनिबंधक, सहकार विभाग

पिंपरी - लेखापरीक्षणाचा अहवाल न देणाऱ्या शहरातील एक हजार सहकारी हाउसिंग सोसायट्यांना सहकार विभागाने नोटिसा दिल्या असून, लवकरच त्यांच्यावर अवसायनाची कारवाई करण्यात येणार आहे.

सहकार विभागाकडे शहरातील दोन हजार ५४४ सहकारी हाउसिंग सोसायट्यांची नोंदणी आहे. त्यापैकी आतापर्यंत एक हजार ५४४ सोसायट्यांनी लेखापरीक्षणाचा अहवाल सादर केला आहे. मात्र, उर्वरित एक हजार सोसायट्यांनी तो अद्याप सादर केला नाही. या संदर्भात त्यांना स्मरणपत्र पाठविले आहे. अवसायनाची कारवाई करताना संबंधित सोसायट्यांना लेखापरीक्षण अहवाल सादर करण्यासाठी दोन महिन्यांची संधी देण्यात येणार आहे. त्यात त्याचे सादरीकरण न झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. 

अहवाल न देणाऱ्यांमध्ये लहान हाउसिंग सोसायट्यांचा समावेश आहे. त्यात सोसायट्यांची देखभाल करण्यासाठी सभासदांकडून ठराविक रक्‍कम काढली जाते. जमा झालेली सर्व रक्‍कम सोसायटीच्या देखभालीवर खर्च होते.

त्यामुळे काहीच रक्‍कम शिल्लक उरत नाही, असे असताना त्याचा लेखापरीक्षण अहवाल कसा सादर करायचा, असा प्रश्‍न अनेक सोसायट्यांना भेडसावत आहे. मात्र, या सोसायट्यांनी सहकार विभागाकडे नोंदणी केलेली आहे. त्यामुळे सहकार कायद्यानुसार त्यांना लेखापरीक्षण देणे बंधनकारक आहे. 

शहरातील सर्व सहकारी हाउसिंग सोसायट्यांना ३० सप्टेंबरपर्यंत वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक आहे. या सभेमध्ये सोसायट्यांनी पुढील वर्षासाठी लेखापरीक्षक नियुक्‍तीचा ठराव करायचा आहे. सहकार विभागाच्या संकेतस्थळावर लेखापरीक्षकांच्या पॅनलची माहिती देण्यात आली आहे.

त्यामधून सोसायट्यांना त्याची निवड करता येणार आहे. सोसायट्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभा न घेतल्यास संबंधित सोसायटीचे लेखापरीक्षण करण्यासाठी सहकार विभागाकडून लेखापरीक्षकांची नियुक्‍ती करण्यात येते. त्यामुळे सर्व सहकारी हाउसिंग सोसायट्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊन हा विषय मार्गी लावण्याचे आवाहन सहकार विभागाकडून करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Notice to Housing Society for Audit Report