इमारतीचे मालक, मोबाईल कंपन्यांना नोटीस 

दिलीप कुऱ्हाडे 
गुरुवार, 13 जून 2019

लक्ष्मीनगरमध्ये इमारतींवर उभारलेल्या पाण्याच्या टाक्‍यांमधील मोबाईल टॉवरची बातमी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध होताच सर्वांचे धाबे दणाणले आहेत.

येरवडा - लक्ष्मीनगरमध्ये इमारतींवर उभारलेल्या पाण्याच्या टाक्‍यांमधील मोबाईल टॉवरची बातमी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध होताच सर्वांचे धाबे दणाणले आहेत. महापालिका बांधकाम विभागाने टॉवर उभारलेल्या इमारतीच्या मालकांसह मोबाईल कंपन्यांना नोटिसा दिल्या आहेत. यामध्ये तीस दिवसांच्या आता खुलासा करावा; अन्यथा टॉवर काढून टाकण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. 

विविध मोबाईल कंपन्यांनी चक्क वस्त्यांमधील इमारतींवर पाण्याच्या टाक्‍यांमध्ये मोबाईल टॉवर उभारले आहेत. याबाबत "सकाळ'मध्ये 31 मे रोजी "दाखवायला पाण्याची टाकी, प्रत्यक्षात मोबाईल टॉवर' अशी बातमी प्रसिद्ध झाली होती. याची पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने दखल घेतली आहे. संबंधित मोबाईल टॉवरची पाहणी करण्यात आल्याची माहिती बांधकाम विभागाचे उपअभियंता जयंत नाझरे यांनी दिली. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी, नवी खडकी, गणेशनगर, येरवड्यातील अनेक इमारतींवर गेली अनेक वर्षे बेकायदा मोबाईल टॉवर उभारले आहेत. याबाबत महापालिका अधिकारी "ब्र' काढत नाहीत. माहिती घेतो, चौकशी करतो, असे सांगून बोळवण करतात. यामध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनीच मोबाईल टॉवर उभारल्याचे व सोसायटीची परवानगी नसल्याचे सोसायटीच्या विश्‍वस्तांनी सांगितले. 

वीजजोडणीबाबत महावितरणचे कानावर हात 
लक्ष्मीनगर येथील मोबाईल टॉवरना नगर रस्ता महावितरणकडून थ्री फेज वीजॉजोड देण्यात आले आहेत. याबाबत येथील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी कानावर हात ठेवले. संबंधित कागदपत्रे पाहिल्यानंतरच "ना हरकत प्रमाणपत्र', जागामालक आणि मोबाईल कंपनी आदींबाबत माहिती देता येईल, असे कार्यकारी अभियंता डी. बी. देशमुख यांनी सांगितले. 

लक्ष्मीनगर येथील पाण्याच्या टाक्‍यांमध्ये मोबाईल टॉवर बसविलेल्या इमारतीच्या मालकांना व मोबाईल कंपन्यांना नोटिसा दिल्या आहेत. त्यांना तीस दिवसांत खुलासा करण्यास सांगितले आहे. खुलासा समाधानकारक नसल्यास टॉवर काढून टाकण्यात येतील. 
- जयंत नाझरे, उपअभियंता, मोबाईल टॉवर सेल, बांधकाम विभाग 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Notice to the owner of the building