ट्रक चोरी प्रकरणी तलाठ्याला नोटीस

प्रफुल्ल भंडारी 
गुरुवार, 5 जुलै 2018

दौंड (पुणे) : दौंड शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधून जप्त केलेला ट्रक संगनमताने सोडून दिल्यानंतर सदर ट्रक चोरी प्रकरणी तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी ट्रक चोरीची फिर्याद देणारे तलाठी माणिक बारवकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.  

दौंड (पुणे) : दौंड शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधून जप्त केलेला ट्रक संगनमताने सोडून दिल्यानंतर सदर ट्रक चोरी प्रकरणी तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी ट्रक चोरीची फिर्याद देणारे तलाठी माणिक बारवकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.  

दौंड व इंदापूर तहसीलदार कार्यालयाने वाळूचोरी रोखण्यासाठी पाटस (ता. दौंड) येथे केलेल्या संयुक्त कारवाईत 2 जून 2018 ला एमएच 12, ईक्यू 9018 हा तीन ब्रास वाळू असलेला ट्रक जप्त करीत पुढील कारवाईसाठी दौंड शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये उभा केला होता. दरम्यान इमारतीमधून 2 जुलै रोजी मध्यरात्री काही महसूल कर्मचारी व त्यांच्या एजंटांच्या सहकार्याने एका ट्रॅक्टरच्या साह्याने बंद अवस्थेतील सदर ट्रक वाळूसह मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर काढण्यात आला होता. त्या दिवशी रात्रपाळीसाठी तलाठी माणिक प्रभू बारवकर व कोतवाल ज्ञानेश्वर बबन रणसिंग यांची नियुक्ती होती. इमारत आवारातील जप्त केलेली वाहने व वाळूचोरीसाठी वापरल्या जाणाऱ्या बोटी चोरीस जाऊ नये याकरिता प्रवेशद्वाराला तहसीलदार यांची शासकीय जीप दररोज आडवी लावली जाते. परंतु त्या दिवशी सदर जीप सुरू करून ती बाजूला काढून ट्रक बाहेर काढण्यात आला होता. त्याचबरोबर एरवी बंद ठेवले जाणारे आवारातील दिवे ट्रक बाहेर काढण्यासाठी सुरू ठेवण्यात आले होते.

दरम्यान दोन दिवसांच्या विलंबानंतर तलाठी माणिक बारवकर (रा. देऊळगाव गाडा, ता. दौंड) यांनी काल (ता. 4) दुपारी दौंड पोलिस ठाण्यात 5 लाख 21 हजार रूपये मूल्य असलेला सदर ट्रक चोरीस गेल्याची फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञाताविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करीत फिर्यादीची सत्यता पडताळणी सुरू केली आहे. इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप व साखळी न तोडता ट्रक चोरीस गेल्याने चोरीच्या फिर्यादीविषयी शंका घेतली जात आहे. या बाबत तबसीलदार बालाजी सोमवंशी यांना आज (ता. 5) या बाबत विचारले असता ते म्हणाले, इमारतीच्या आतून ट्रक चोरीस जाण्याचा प्रकार संशयास्पद आहे. सदर ट्रक चोरी प्रकरणी तलाठी यांना नोटीस देऊन खुलासा मागविण्यात आला आहे.

Web Title: Notice to talathi in case of truck theft case