कादंबरीकार उत्तम तुपे यांची परवड 

संपत मोरे
शनिवार, 8 डिसेंबर 2018

पुणे : "झुलवा' कादंबरीच्या माध्यमातून मराठी साहित्यात मोलाची भर घालणाऱ्या उत्तम बंडू तुपे यांच्या आयुष्याची परवड सुरू आहे. त्यांना पक्षाघाताच्या विकाराने गाठले असून त्यांच्या पत्नीही आजारी आहेत. त्या दोघांना उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. 

पुणे : "झुलवा' कादंबरीच्या माध्यमातून मराठी साहित्यात मोलाची भर घालणाऱ्या उत्तम बंडू तुपे यांच्या आयुष्याची परवड सुरू आहे. त्यांना पक्षाघाताच्या विकाराने गाठले असून त्यांच्या पत्नीही आजारी आहेत. त्या दोघांना उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. 

झुलवा, खुळी, कळा, कळाशी, नाक्षारी, भस्म, चिपाड, इंजाळ, झावळ, माती आणि माणसं या कादंबऱ्या आणि "काट्यावरची पोट' हे आत्मकथन लिहिणारे तुपे आज पुण्यातील खडकी येथील झोपडपट्टीत दारिद्य्राच्या अंधारात चाचपडत आहेत. ते आणि त्यांची पत्नी दोघेही आला दिवस ढकलत आपलं आयुष्य काढत आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न सुरू असताना तुपे यांच्यासारखा स्वाभिमानी बाण्याचा लेखक मात्र उपेक्षेच्या अंधारात चाचपडत आहे. 

"सकाळ'ने तुपे यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले, "आजवर खूप उपेक्षा झाली आहे, पण कोणावर राग नाही. कारण आता कोणाला बोलून काय फायदा? सरकारकडून घोर उपेक्षा झालीय. लेखक म्हणून मी माझं काम करत राहिलो. कोणी काही द्यावं अशी अपेक्षा नव्हती. मला आजाराने गाठलं आहे याचं दुःख होतंय, कारण मला शेतकऱ्यांच्या जीवनावर एक कादंबरी लिहायची होती. पण हात चालत नसल्याने ती लिहू शकत नाही. याचंच दुःख आहे.' 

आयुष्य शोकांतिका... 
एका छोट्याशा खोलीत तुपे राहतात. आयुष्यभर त्यांना लिखाण करायला टेबल आणि खुर्ची मिळालेली नाही. चटईवर बसून त्यांनी सगळी पुस्तकं लिहिली आहेत. एका सरकारी कार्यालयात त्यांनी शिपाई म्हणूनही काम केले होते. सातारा जिल्ह्यातील माण-खटाव तालुक्‍यातील बोली भाषा त्यांनी मराठी साहित्यात आणली. व्यंकटेश माडगूळकर यांच्यानंतरचा माणदेश त्यांनी मराठीत आणला. त्यांची "झुलवा' कलाकृती खूप गाजली. त्यावरचे नाटक दिल्लीत झाले. कधीकाळी प्रसिद्धीच्या शिखरावर असलेला हा लेखक आज स्वतःच्या आजारावर उपचार करावे एवढाही सक्षम राहिलेला नाही. त्यांचं आयुष्य शोकांतिका बनली आहे

Web Title: novel writer Uttam Tupe lives in bad condition