आता वाहनांचे पसंती क्रमांक ऑनलाइन!

आता वाहनांचे पसंती क्रमांक ऑनलाइन!

पुणे : वाहनांसाठीचे पसंती क्रमांकांचे (चॉइस नंबर) आता ऑनलाइन पद्धतीने लिलाव होणार आहेत. त्यासाठी परिवहन कार्यालयाने नियमावलीत बदल केले आहेत. नॅशनल इन्फर्मेटिक्‍स सेंटरच्या (एनआयसी) माध्यमातून संगणकीय प्रणाली निर्माण केली आहे. त्यामुळे पसंती क्रमांकांची "ऑफलाइन' पद्धत लवकरच बंद होणार आहे.

परिवहन विभागाने दोन वर्षांपासून "सारथी' व "वाहन' या संगणक प्रणालीमार्फत वाहनविषयक सर्व सेवा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिल्या आहेत. आरटीओशी संलग्न सर्व कामे नागरिकांना घरबसल्या करता यावीत, यासाठी वाहनचालक परवाना, वाहन नोंदणी, योग्यता प्रमाणपत्र, वाहनावरील कर्जबोजा चढविणे-उतरविणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र, सर्व कर भरणे, वाहन परवाना नूतनीकरण आदी सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत.

या सेवांबरोबरच आता पसंती क्रमांकही नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने घेता यावेत, यासाठी एनआयसीकडून यंत्रणा उपलब्ध करून घेतली आहे. त्यासाठी नियमावलीत बदल करणे आवश्‍यक होते. त्यामुळे यंत्रणा तयार असूनही ही सेवा ऑनलाइन होत नव्हती. परिवहन आयुक्त कार्यालयाने नियमावलीत बदल करण्याचे काम सुरू केले. लवकरच त्यास मान्यता मिळाल्यानंतर ही सेवाही ऑनलाइन दिली जाणार आहे. 

चॉइस नंबर ऑनलाइन का? 

पुणे आरटीओला चॉइस नंबरच्या माध्यमातून सर्वाधिक महसूल मिळतो. एका वर्षात दुचाकी क्रमांकाच्या अठरा ते वीस, तर चारचाकी क्रमांकाच्या चार ते पाच मालिका संपतात. या मालिकांतील आकर्षक व पसंती क्रमांकाच्या माध्यमातून पुणे कार्यालयाला वर्षाला सुमारे 20 ते 24 कोटींचा महसूल मिळतो.

या क्रमांकाच्या वितरणाची सेवा पुरविण्यासाठी आरटीओला मोठे मनुष्यबळ खर्ची करावे लागते. त्यामुळे ही सेवा ऑनलाइन पद्धतीने कार्यान्वित होणे गरजेचे आहे, अशी मागणी आरटीओ कर्मचाऱ्यांबरोबरच नागरिकही करीत होते. त्यानुसार परिवहन आयुक्त कार्यालयाने हा निर्णय घेतला. 

अशी आहे यंत्रणा... 

- परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर दुचाकी, चारचाकी वाहनांच्या मालिकेतील सर्व क्रमांक दिसणार 
- वाहनमालकाने ऑनलाइन क्रमांक पसंत करून त्याचे शुल्क भरायचे 
- एका क्रमांकासाठी अनेकांनी शुल्क भरले, तर त्या क्रमांकाचा ऑनलाइन लिलाव होणार 
- जो वाहनमालक जास्त बोली लावेल, त्याला संबंधित क्रमांक मिळणार 
- ही सेवा पूर्णपणे मानवी हस्तक्षेपरहित असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com