आता स्पर्धा पदांसाठी भाजपमध्ये इच्छुकांकडून प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

पुणे - प्रतिस्पर्ध्यांबरोबरील लढाई झाल्यावर आता महापौरपदासह महापालिकेतील अन्य विविध पदांसाठीची स्पर्धा नव्याने निवडून आलेल्या सदस्यांमध्ये सुरू झाली आहे. त्यासाठी भाजपमध्ये इच्छुकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याबाबतच्या घडामोडी येत्या आठ दिवसांत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक 15 मार्च रोजी होण्याची दाट शक्‍यता आहे.

पुणे - प्रतिस्पर्ध्यांबरोबरील लढाई झाल्यावर आता महापौरपदासह महापालिकेतील अन्य विविध पदांसाठीची स्पर्धा नव्याने निवडून आलेल्या सदस्यांमध्ये सुरू झाली आहे. त्यासाठी भाजपमध्ये इच्छुकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याबाबतच्या घडामोडी येत्या आठ दिवसांत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक 15 मार्च रोजी होण्याची दाट शक्‍यता आहे.

महापालिकेचा सध्याचा कार्यकाळ 14 मार्चपर्यंत आहे. त्यामुळे 15 मार्च रोजी नवे सदस्य सभागृहात येतील. त्या दिवशी महापौर-उपमहापौरपदाची निवड होईल. त्यानंतर महापौरांच्या नेतृत्वाखाली सभागृह नेता आणि विरोधी पक्षनेत्याची निवड होईल. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना त्यांचे गटनेते निश्‍चित करतील. त्याची माहिती महापौरांकडे पत्राद्वारे संबंधित पक्षांकडून दिली जाईल. त्यामुळे नव्या सभागृहाचे कामकाज महापौरांची निवड झाल्यावरच सुरू होणार आहे. महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम पुढील आठवड्यात जाहीर होणार आहे. त्यानुसार प्रक्रिया सुरू होईल.

आठ दिवसांत उमेदवार
महापालिकेत भाजपला एकहाती सत्ता मिळाली आहे. त्यामुळे सत्तेची सर्व पदे पक्षाकडेच राहणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. महापौरपद सर्वसाधारण महिला वर्गासाठी राखीव आहे. त्यासाठी मुक्ता टिळक, रेश्‍मा भोसले, वर्षा तापकीर, कविता वैरागे, मानसी देशपांडे, मंजुषा नागपुरे आदी इच्छुक आहेत. महापौरपद महिलांसाठी राखीव असल्यामुळे पक्षातील पुरुष सदस्याला उपमहापौरपद दिले जाईल, असे पक्षांतर्गत सूत्रांनी स्पष्ट केले. पाचव्यांदा निवडून आलेले सुनील कांबळे हे गटनेतेपद आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. त्याशिवाय हेमंत रासने, श्रीनाथ भिमाले, राजू शिळीमकर, धीरज घाटे आदी सभागृह नेतेपदासाठी इच्छुक आहेत.

स्वीकृतसाठीही लॉबिंग
महापालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या चार जागा भाजपला मिळणार आहेत. त्यासाठी उज्ज्वल केसकर, गोपाळ चिंतल, गणेश घोष, उदय जोशी, ज्योत्स्ना सरदेशपांडे आदींच्या नावांची चर्चा सुरू आहे. महापालिका निवडणुकीत पराभूत झाले असले तरी गणेश बिडकर यांचीही स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती होऊ शकते, असे पक्षातील सूत्रांनी नमूद केले.

आठ दिवसांत या पदांचे ठरणार उमेदवार
- महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, स्थायी समितीचे अध्यक्षपद, स्थायी समितीचे सदस्यत्वपद, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण, विधी समिती, क्रीडा समितीची अध्यक्षपदे आणि सदस्य, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद, पीएमपी संचालकपद आणि महापालिकेतील चार स्वीकृत सदस्य.

महापौरपदासह महापालिकेतील अन्य पदांसाठी इच्छुक नगरसेवक माझ्याकडे इच्छा व्यक्त करीत आहेत. मात्र, पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांशी येत्या दोन-तीन दिवसांत चर्चा केली जाईल. त्यानंतर काही नावे सहमतीने निश्‍चित करून प्रदेशकडे पाठविली जातील. पदाधिकारी निश्‍चित करताना पक्षनिष्ठा, अनुभव, पक्षांतर्गत कामगिरी आदी विविध निकषांच्या आधारे निवड केली जाईल.
- गिरीश बापट, पालकमंत्री

Web Title: Now competition for positions in the party trying to interested