"आई, आता फक्त अभ्यास कर...' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

एकोणचाळिसाव्या वर्षी दहावीची परीक्षा देणाऱ्या लक्ष्मी यांना मुलांचे प्रोत्साहन. 

पुणे - "अरे परीक्षा आलीय अभ्यास कर...खेळू नकोस, टीव्ही पाहू नकोस...', परीक्षा जवळ आली किंवा परीक्षा सुरू झाली की आई हमखास मुलांना हे सातत्याने सांगत असते; पण कासेवाडीतील मोरे परिवारात चित्र काही वेगळेच आहे. "आई, आता काम नको, स्वयंपाकघरात पाऊलच ठेवायचं नाही बरं!, टीव्हीवरच्या सासू-सुनेच्या मालिकाही बंद...आता काही दिवस फक्त अभ्यास एके अभ्यास', असे सांगणारी मुलं "आई'ला अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. 

मोरे कुटुंबातील लक्ष्मी राजू मोरे या वयाच्या 39 व्या वर्षी दहावीची परीक्षा देत आहेत. त्यांनी ही परीक्षा व्यवस्थित द्यावी, या काळात कामाला सुटी देऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, यासाठी त्यांची मुले धडपडत आहेत. सकाळी पाच वाजल्यापासून घरातील कामे, पती आणि मुलांचा डबा, स्वतः:चे आवरून कामाला जाणे, संध्याकाळी पुन्हा घरातली कामे, काही वेळ टीव्हीवरील कार्यक्रम पाहणे, असा लक्ष्मीताईंचा दिनक्रम; परंतु दहावीच्या परीक्षेमुळे त्यात खंड पडला असून, त्यांनी केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आहे. 

भवानी पेठेतील स्नेहदीप जनकल्याण फाउंडेशनमध्ये गेल्या दहा वर्षांपासून लक्ष्मीताई फिल्डवर्कर म्हणून काम पाहत आहेत. अवघ्या 15-16 व्या वर्षी त्यांचे लग्न राजू मोरे यांच्याशी झाले. लग्नापूर्वी नववीपर्यंतचे शिक्षण झाले होते; परंतु लग्नानंतर घरातील जबाबदारी सांभाळताना त्यांच्या शिक्षणात खंड पडला. त्यांची मुलगी प्रीती बी.कॉम. आणि मुलगा मयूरचे बी.सी.ए.पर्यंत शिक्षण झाले असून, धाकटी मुलगी पूजा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करत आहे. "मुलांचे शिक्षण पूर्ण झाल्यामुळे मी माझे शिक्षणाचे स्वप्नं पूर्ण करायचे ठरवले,' असे लक्ष्मीताई सांगतात. 

आपण शिक्षण घेतले, तर कामाच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. या वयातही चांगले करिअर करता येऊ शकते, असे मला वाटते म्हणूनच मी पुढील शिक्षण घ्यायचा निर्णय घेतला आणि पती, मुलांनी त्याला प्रोत्साहन दिले. 
- लक्ष्मी मोरे 

Web Title: now just studying