मेरे पुलिस दोपहर का लंच अपने घर करेंगे : पुण्याचे पोलिस आयुक्त 

पांडुरंग सरोदे
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

शेवटच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास लक्ष्मी रस्त्यावरून शास्त्री रस्त्याकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर बहुतांश मार्गांवरील वाहतूक सुरळीत झाली आहे. मिरवणुकीमुळे बंद असलेले शहरातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. 

पुणे : 'मेरे पुलिस अब दोपहर का लंच अपने घर करेंगे' अशा शब्दांत पुण्याचे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेश यांनी पोलिसांच्या कामगिरीचे आज (सोमवार) कौतुक केले. पोलिसांच्या नियोजनामुळे यंदाची गणपती विसर्जन मिरवणूक नेहमीपेक्षा लवकर संपली आहे. त्यामुळे पोलिसही एरवीपेक्षा यंदा तणावमुक्त असल्याचे जाणवले. 

विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि इतर साऊंड सिस्टिमवर बंदी घालण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत मंडळाचे कार्यकर्ते आणि प्रशासनामध्ये तणाव निर्माण होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता. या पार्श्‍वभूमीवर शहर पोलिसांनी सूक्ष्म नियोजन केले आणि त्याची अचूक अंमलबजावणी केल्यामुळे मिरवणुकीत त्याचा परिणाम दिसून आला, असे डॉ. व्यंकटेश यांनी सांगितले. पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणूक दुपारी साडेबाराच्या सुमारास संपली. 

पुण्यात मानाच्या पाच गणपती मंडळांनी दिलेल्या आश्‍वासनानुसार, सर्व मंडळांमध्ये पंधरा मिनिटांचे अंतर राखता आले नसले, तरीही इतर अनेक मंडळे इतर वर्षांच्या तुलनेत लवकर मिरवणुकीत दाखल करण्यात पोलिसांना यश आले. विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी विविध मंडळांवर कारवाई करून 33 उपकरणे जप्त केली आहेत; तर विविध कलमांखाली 75 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मिरवणुकीमध्ये चोरी करणारी मालेगावच्या एका टोळीसही पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 75 मोबाईल जप्त करण्यात आले. 

पुण्यातील वाहतुकीची स्थिती 
शेवटच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास लक्ष्मी रस्त्यावरून शास्त्री रस्त्याकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर बहुतांश मार्गांवरील वाहतूक सुरळीत झाली आहे. मिरवणुकीमुळे बंद असलेले शहरातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. 

इतका वेळ चालली मिरवणूक 

  • कसबा गणपती : सकाळी 10.30 ते दुपारी 4.08 
  • तांबडी जोगेश्‍वरी : सकाळी 10.35 ते सायंकाळी 5.13 
  • गुरुजी तालीम : सकाळी 10.43 ते सायंकाळी 5.33 
  • तुळशीबाग मंडळ : दुपारी 12.25 ते सायंकाळी 6.25 
  • केसरीवाडा : दुपारी 1.40 ते सायंकाळी 7.05 
  • श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट : सायंकाळी 7.50 ते पहाटे 2.30 
  • अखिल मंडई मंडळ : रात्री 8.11 ते पहाटे 4.30
  • श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट : रात्री 11.05 ते पहाटे 4.58 
Web Title: Now My policemen can have their lunch at home, says Pune CP