पुण्यात पार्किंगसाठी आता मोजावे लागणार पैसे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

पुणे : शहरातील वाहतूक कोंडी आणि एकाच ठिकाणी तास न तास पार्क करणाऱ्या वाहनचालकांना रोखण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीने पार्किंग धोरणास मंजुरी दिली. या निर्णयानंतर शहरात रस्त्यावर दिवसा आणि रात्री वाहने पार्क करणाऱ्या नागरिकांना पैसे मोजावे लागणार आहेत.

दुचाकीस्वारांना पार्किंगसाठी प्रति तासाला किमान दोन ते चार रुपये, रिक्षाला सहा ते 12 रुपये आणि मोटारींना दहा ते 20 रुपये आकारण्यात येईल. 
 

पुणे : शहरातील वाहतूक कोंडी आणि एकाच ठिकाणी तास न तास पार्क करणाऱ्या वाहनचालकांना रोखण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीने पार्किंग धोरणास मंजुरी दिली. या निर्णयानंतर शहरात रस्त्यावर दिवसा आणि रात्री वाहने पार्क करणाऱ्या नागरिकांना पैसे मोजावे लागणार आहेत.

दुचाकीस्वारांना पार्किंगसाठी प्रति तासाला किमान दोन ते चार रुपये, रिक्षाला सहा ते 12 रुपये आणि मोटारींना दहा ते 20 रुपये आकारण्यात येईल. 
 

शहरात जवाहरलाल नेहरू पुर्ननिर्माण योजना (जेएनएनयूआरएम) आणि मेट्रो प्रकल्प राबविताना पालिकेला पार्किंग धोरण राबविणे बंधनकारक होते. शिवाय, सर्वसाधारण सभेने सर्वंकष वाहतूक आराखड्यास मान्यता दिली. त्यावेळी पार्किंग धोरण जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र, मेट्रो प्रकल्पासाठी पार्किंग धोरण निश्‍चित करण्याच्या मुदतीला काही दिवस शिल्लक असताना पार्किंग धोरण ठरविण्यात आले.

महापालिका प्रशासनाने आखलेल्या या धोरणाला स्थायी समितीने मंगळवारी आयोजित बैठकीत मंजुरी दिली. सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनंतर आणि पार्किंगसाठी जागा निश्‍चित केल्यानंतर या धोरणाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, वाहतूक विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला यावेळी उपस्थित होते. 

रहदारीनुसार वर्गवारी आणि पार्किंगचे दर - 
शहरात रस्त्यांवरील रहदारी आणि गर्दी विचारात घेऊन तीन झोन निश्‍चित करण्यात आले आहेत. 'अ' झोनमध्ये कमी वर्दळ, 'ब' झोनमध्ये तीव्र वर्दळ आणि 'क' झोनमध्ये अतितीव्र वर्दळ अशी वर्गवारी करण्यात येणार आहे.

त्या वर्गवारीनुसार अनुक्रमे दुचाकींना दोन रुपये, तीन आणि चार रुपये, रिक्षाचालकांना सहा रुपये, नऊ आणि 12 रुपये तसेच चारचाकी वाहनांना दहा, 15 आणि 20 रुपये दर आकारण्यात येणार आहे. 

  • प्रशासनाच्या प्रस्तावित दरापेक्षा 80 टक्‍के कपात केल्याचा स्थायीचा दावा 
  • पार्किंग झोनसाठी शहरातील 1800 किलोमीटरचा सर्वे करणार 
  • पोलिस आणि महापालिकेच्या पथकाकडून संयुक्‍त पाहणी 
  • पोलिसांच्या अधिसूचनेनंतर पार्किंग झोन निश्‍चित करून प्रत्यक्ष अंमलबजावणी 
  • रात्री दहा ते आठपर्यंत पार्किंगची रक्‍कम महापालिका वसूल करणार 
  • दिल्ली, मुंबई आणि नागपूर येथील पार्किंगच्या तुलनेत दर कमी असल्याचा दावा 
  • स्थायी समितीमध्ये दहा विरुद्ध चार मताने प्रस्ताव मंजूर 

असे असतील पार्किंगचे दर - 
पार्किंगचे दर अ, ब आणि क वर्गवारीनुसार (प्रति तासाला) 

वाहन प्रकार अ वर्ग ब वर्ग क वर्ग
दुचाकी दोन रुपये तीन रुपये चार रुपये
तीनचाकी आणि रिक्षा सहा रुपये नऊ रूपये 12 रुपये
मोटार 10 रुपये 15 रुपये 20 रुपये
मालवाहू टेम्पो सहा रुपये नऊ रुपये 12 रुपये
मिनी बस 15 रुपये 12 रुपये 30 रुपये
अवजड वाहने आणि ट्रक 20 रुपये 30 रुपये 40 रुपये
खासगी प्रवासी बस 30 रुपये 45 रुपये 60 रुपये
Web Title: Now Pay for parking on streets of Pune