पीएच.डी.साठी आता कठोर निकष

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जानेवारी 2017

पुणे - संशोधनाचा दर्जा वाढावा म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाने पीएच.डी.चे निकष कठोर केले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्याचा सहा महिन्यांचा प्रगती अहवाल संशोधन सल्लागार समितीपुढे ठेवण्याचे बंधन घातले आहे. तसेच, मार्गदर्शकांकडील विद्यार्थिसंख्यादेखील मर्यादित केली आहे. विद्यापीठाने

पुणे - संशोधनाचा दर्जा वाढावा म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाने पीएच.डी.चे निकष कठोर केले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्याचा सहा महिन्यांचा प्रगती अहवाल संशोधन सल्लागार समितीपुढे ठेवण्याचे बंधन घातले आहे. तसेच, मार्गदर्शकांकडील विद्यार्थिसंख्यादेखील मर्यादित केली आहे. विद्यापीठाने

नव्या निकषांनुसार मार्गदर्शक तत्त्वे संकेतस्थळावर दिली आहेत.
पीएच.डी.साठी नव्याने तयार केलेले निकष जुलै 2016 पासून लागू असतील; परंतु 2009 च्या निकषांनुसार ज्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झालेली आहे, त्यांना जुने नियम लागू राहतील. यापूर्वी पीएच.डी. दोन वर्षांत पूर्ण करता येत होती, त्यासाठी आता किमान तीन वर्षांची मर्यादा ठेवली आहे. एम.फिल. करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आला असून, पूर्वी दीड वर्षात पूर्ण करावे लागणारे एम.फिल. आता एका वर्षात पूर्ण करता येईल. पीएच.डी.साठी कमाल मर्यादा पूर्वी पाच वर्षांची होती, आता ती सहा वर्षांची केली आहे. तसेच, पुन्हा दोन वर्षांचा वाढीव कालावधी सर्व विद्यार्थ्यांना मिळेल. या शिवाय महिला आणि अपंगांसाठी आणखी दोन वर्षांची सवलत मिळेल. तसेच, महिलांना याव्यतिरिक्त 180 दिवसांची प्रसूती रजा मिळेल. एम.फिल.साठी महिला आणि अपंगांना मिळणारा वाढीव कालावधी एक वर्षाचा असेल.

विद्यार्थिसंख्येवर मर्यादा
जुन्या नियमांमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक यांना आठ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येत होते. नव्या नियमात पीएच.डी.साठी प्राध्यापकांना आठ, सहयोगी प्राध्यापकांना सहा आणि सहायक प्राध्यापकांना चार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येईल. एम.फिल.साठी प्राध्यापकांना तीन, सहयोगी प्राध्यापकांना दोन आणि सहायक प्राध्यापकांना एका विद्यार्थ्याला मार्गदर्शन करता येईल. यापूर्वी सरसकट प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येत होते.

प्रवेशप्रक्रिया लवकर होणार
नव्या बदलाबाबत उपकुलसचिव उत्तम चव्हाण म्हणाले, 'पीएच.डी.साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी प्रवेश परीक्षा सक्तीची झाली आहे. यापूर्वी एखाद्या क्षेत्रात पंधरा वर्षे काम केले असेल आणि त्याच विषयात पीएच.डी. करायची असेल, तर प्रवेश परीक्षेतून सूट मिळत होती, ती यापुढे मिळणार नाही. एम.फिल. आणि पीएच.डी.साठी पदव्युत्तर पदवी असणे आवश्‍यक आहे. यापूर्वी पीएच.डी. प्रवेशासाठी शंभर गुणांचे दोन पेपर होते. आता शंभर गुणांचा एकच पेपर द्यावा लागेल. नव्या नियमांमुळे प्रवेशाची प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण होईल.''

प्रमुख बदल
- पीएच.डी.चे संशोधन सुरू करण्यापूर्वी तयारीचा अभ्यासक्रम (कोर्सवर्क) पूर्वी 20 श्रेयांकांचा (क्रेडिट) होता, आता तो 16 श्रेयांकांचा असेल.
- प्रबंध सादर करताना पानाच्या एका बाजूनेच मजकूर असावा, असा नियम होता. प्रबंधातील पानांची संख्या कमी करण्यासाठी आता दोन्ही बाजूने मजकूर प्रिंट करता येणार आहे.
- प्रबंधाच्या कागदाची लांबी आणि रुंदी याबद्दल नियम नव्हता, आता ए4 याच आकारात प्रबंध सादर करावा लागणार आहे. हा निर्णय सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.

Web Title: Now strict criteria for Ph.D.