आता 'ब्रेन ट्यूमर'वर इलाज प्रोटीनचा

सम्राट कदम
रविवार, 21 जुलै 2019

जनुकीय अभियांत्रिकीच्या वापरातून 'एफबीएक्‍सओ 16' प्रथिनांची वाढ करणे शक्‍य आहे. हे संशोधन मेंदूशी निगडित कर्करोगाच्या उपचारासाठी वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडवेल, असा विश्‍वास संशोधकांना आहे.

पुणे : मेंदूशी निगडित कर्करोगावर अद्यापही प्रभावी उपचार पद्धत वैद्यकशास्त्रात उपलब्ध नाही. मेंदूच्या कर्करोगांपैकी 'ग्लायोब्लास्टोमा' हा वेगाने वाढणारा कर्करोग सर्वांत भयंकर समजला जातो. देशात 20 हजार लोकांना दरवर्षी या आजाराचे निदान होते आणि त्यापैकी चौदा ते पंधरा हजार जण दगावतात. याची दखल घेत राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्रातील (एनसीसीएस) डॉ. अंजली शिरास आणि मोहसीना अंजुम खान यांनी केलेल्या संशोधनातून 'एफबीएक्‍सओ 16' नावाचे प्रथिन या ट्यूमरला नियंत्रित करण्यासाठी प्रभावी असल्याचे समोर आले आहे. 

अमेरिकेतील 'न्यूयो प्लासीया' या शोधपत्रिकेत यासंबंधीचा शोधनिबंध जानेवारीमध्ये प्रकाशित झाला आहे. याविषयी मोहसीना खान म्हणाल्या, ''ग्लायोब्लास्टोमा ट्यूमर झालेल्या रुग्णाच्या मेंदूतील पेशींचा आम्ही अभ्यास केला. त्यात असे लक्षात आले, की 'एफबीएक्‍सओ 16' हे प्रथिन ज्या पेशींमध्ये कमी प्रमाणात आहे, तेथे या ट्यूमरची वाढ मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे पेशींमध्ये या प्रथिनाची वाढ केल्यास हा ट्यूमर नियंत्रणात राहतो.'' 

देशातील एकूण ब्रेन ट्यूमरपैकी 22 टक्के ट्यूमर हे 'ग्लायोब्लास्टोमा' प्रकारात मोडतात. याविषयी डॉ. शिरास म्हणाल्या, ''या ट्यूमरवर जगभरात फार कमी प्रमाणात संशोधन झाले आहे. पेशी केंद्रकात आढळणारे 'बीटा कॅटोनीन' हे प्रथिन 'ट्यूमर'च्या वाढीसाठी कारणीभूत ठरते. आमच्या संशोधनातील 'एफबीएक्‍सओ 16' हे प्रथिन या बीटा कॅटोनीनच्या वाढीलाच थेट प्रतिबंध करते. त्यामुळे उपचारासाठी हे अत्यंत प्रभावी आहे.'' जनुकीय अभियांत्रिकीच्या वापरातून 'एफबीएक्‍सओ 16' प्रथिनांची वाढ करणे शक्‍य आहे. हे संशोधन मेंदूशी निगडित कर्करोगाच्या उपचारासाठी वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडवेल, असा विश्‍वास संशोधकांना आहे. 

'ग्लायोब्लास्टोमा' ब्रेन ट्यूमर 
- जगातील एकूण कर्करोगांपैकी दोन टक्के प्रमाण 
- मेंदूतील 'ट्यूमर'मुळे रुग्ण एक ते दीड वर्षातच दगावतो 
- देशात वर्षभरामध्ये वीस हजार रुग्ण या प्रकारातील आढळतात 
- एकूण ब्रेन ट्यूमरच्या रुग्णांपैकी 22 टक्के रुग्णांना हा ट्यूमर 

कर्करोगावरील इतर उपचारपद्धतींपेक्षा ही पद्धत प्रभावी आणि स्वस्त आहे. 'एफबीएक्‍सओ 16' प्रथिनामुळे मेंदूतील ट्यूमरवाढीला कारणीभूत असलेल्या 'बीटा कॅटोनीन'ची वाढ नियंत्रित करता येते. 'ट्यूमर'चा शोध घेणे, व्यवस्थापन करणे आणि त्यावर योग्य उपचार करणे, या संशोधनामुळे शक्‍य होणार आहे. 
- डॉ. अंजली शिरास, राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now treat the protein on a brain tumor