आता घरी बसूनही करता येणार अभ्यास !

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

कला, वाणिज्य, विज्ञान ही साचेबंद व्यवस्था बदलायला हवी. विद्यार्थ्याला खेळाडू, कलाकार बनण्याचे स्वप्न पूर्ण करता यावे, त्यात नियमित शाळेचा अडसर येऊ म्हणून मुक्त विद्यालय मंडळ स्थापन केले आहे. दिव्यांग मुलांनाही याचा फायदा होईल. मुक्तशाळेमुळे रात्रशाळा बंद होतील, हा अपप्रचार आहे. कोणतीही रात्रशाळा बंद करणार नाही. 

- विनोद तावडे (शिक्षणमंत्री) 

पुणे : एखादी कला वा खेळामुळे तुम्हाला शाळेत जाता येत नसेल, तर आता काळजी करू नका. शाळेमुळे एखाद्या स्पर्धेला मुकण्याची वेळ आता येणार नाही. तुम्हाला घरी बसून अभ्यास करता यावा आणि परीक्षा देता यावी, यासाठी शालेय शिक्षण मंडळाने "मुक्त विद्यालय' सुरू केले आहे. यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांनाही शिक्षणाच्या प्रवाहात येता येईल. 

अनेक विद्यार्थी खेळात वा कलेत गती असूनही शाळेमुळे त्यावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. तसेच, अनेक दिव्यांगांना, सामान्य विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन शिक्षण घेता येत नाही. याचा विचार करून राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना केली आहे. त्याचे उद्‌घाटन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत तीन विद्यार्थ्यांनी केले. शिक्षण सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे या वेळी उपस्थित होत्या. 

अभ्यासासाठी पाच विषय 

सुरवातीला पाचवी आणि आठवीसाठी वयाची दहा आणि तेरा वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. भविष्यात दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमाचा यात समावेश असेल.

विद्यार्थ्याचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी असेल, तर नियमित शाळेत जाणार नसल्याचे पालकांचे प्रतिज्ञापत्र आवश्‍यक आहे. प्रवेशासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल. दोन भाषा, गणित, परिसर अभ्यास आणि कला, असे पाच विषय परीक्षेला असतील. मुक्तशाळेची परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाणार आहे. 

स्वअध्यन पुस्तके 

विद्यार्थ्यांनी नोंदणी शुल्क भरून प्रवेश घेतल्यानंतर त्यांना स्वअध्ययनासाठी पुस्तिकादेखील दिली जाणार आहेत. त्या सोडविल्यानंतर संपर्क केंद्रावर जाऊन तपासून घ्यायच्या आहेत. त्यासाठी प्रवेशासाठी विद्यार्थ्याला संपर्क केंद्र निश्‍चित करावे लागेल. शिक्षण विभागाने राज्यभरात 543 संपर्क केंद्रे निश्‍चित केलेली आहेत. तेथे शैक्षणिक मार्गदर्शनदेखील मिळणार आहे. मुक्त विद्यालयाची सविस्तर माहिती http://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर दिलेली आहे. 

Web Title: Now you can seat at home to study