esakal | बारामतीकरांना दिलासा; कोरोनाचे मळभ लागले हटू
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीकरांना दिलासा; कोरोनाचे मळभ लागले हटू

बारामतीतील रुग्णांचा आकडा झपाट्याने कमी होतो आहे. तपासण्यांची संख्या सरासरी 300 इतकी असूनही रुग्णांचा आकडा कमी होत असल्याने संशयित व संपर्कातील रुग्णही कमी होऊ लागले आहेत.

बारामतीकरांना दिलासा; कोरोनाचे मळभ लागले हटू

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : शहरातील कोरोनाचे संकट आता दूर होऊ लागले आहे. बारामतीतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82 टक्क्यांवर पोहोचले असून मृत्यूदरही 2.4 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. 

बार, हॉटेलचालकांनो, आता नियम मोडू नका नाहीतर... 

बारामतीत काल 170 आरटीपीसीआर तर खाजगी प्रयोगशाळेत 77 व को-हाळे येथे 51 संशयितांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली. या एकूण 298 रुग्णांची तपासणी झाली. त्यात 38 जण पॉझिटीव्ह सापडले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. 

बारामतीतील रुग्णांचा आकडा झपाट्याने कमी होतो आहे. तपासण्यांची संख्या सरासरी 300 इतकी असूनही रुग्णांचा आकडा कमी होत असल्याने संशयित व संपर्कातील रुग्णही कमी होऊ लागले आहेत. बारामतीत आता बेडची संख्या अपुरी पडणे किंवा आवश्यक इंजेक्शनची उपलब्धता या दोन्ही बाबत स्थिती सामान्य असल्याचे खोमणे म्हणाले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82 टक्क्यांच्या आसपास पोहोचले असल्याने स्थिती आता नियंत्रणाखाली असल्याचे चित्र आहे. लोकांमध्ये कोरोनाबाबत जागरुकता वाढली, मास्कचा वापर, सुरक्षित अंतर राखणे, सॅनेटायझर्सचा वापर, कोणतेही लक्षण आढळल्यास तातडीने तपासणीसाठी जाणे या सारख्या बाबींमुळे आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या तितक्याच वेगाने खाली येऊ लागली आहे. 

बारामतीतील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयातील 168 ऑक्सिजनच्या उपलब्ध खाटांपैकी सध्या 104 रुग्ण दाखल असून व्हेंटीलेटरवर 16 रुग्ण आहेत. लक्षणेविरहीत रुग्णसंख्या 236 असून सौम्य लक्षणे असलेल्यांची संख्या 184 इतकी असल्याचे खोमणे यांनी सांगितले. 

बार, हॉटेलचालकांनो, आता नियम मोडू नका नाहीतर... 

प्रशासनाला काहीसा दिलासा...
बारामतीत गेल्या काही दिवसात लॉकडाऊननंतर व्यवहार सुरळीत सुरु झाल्यानंतरही आता रुग्णसंख्या आटोक्यात असल्याने प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. शहर व तालुक्यात जे भीतीचे वातावरण होते ते आता निवळले असून भीतीची जागा आता सतर्कतेने घेतली आहे. मास्क वापरणा-यांचे प्रमाण जवळपास शंभर टक्क्यापर्यंत पोहोचले आहे. 

 (संपादन : सागर दिलीपराव शेलार)