esakal | बारामतीत कोरोनाग्रस्तांची संख्या लागली पुन्हा वाढू
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत कोरोनाग्रस्तांची संख्या लागली पुन्हा वाढू

शहरात कोरोना हद्दपार झाल्याच्या थाटात सध्या व्यवहार सुरु असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा या बेफिकीरीने वाढेल की काय अशी भीती आता व्यक्त होऊ लागली आहे

बारामतीत कोरोनाग्रस्तांची संख्या लागली पुन्हा वाढू

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : शहरात कोरोना हद्दपार झाल्याच्या थाटात सध्या व्यवहार सुरु असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा या बेफिकीरीने वाढेल की काय अशी भीती आता व्यक्त होऊ लागली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज बारामतीत 32 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. राज्य शासनाने अनलॉक प्रक्रीयेत आता तर सोमवारपासून नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गांना परवानगी दिली असल्याने गर्दीत आणखी भरच पडणार आहे. 

बारामतीत आरटीपीसीआर तपासणीत रुग्णसंख्या कमी असली तरी रॅपिड अँटीजेनमध्ये पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. काल बारामतीत 393 आरटीपीसीआर तपासण्या झाल्या, त्यात सात जण पॉझिटीव्ह होते, त्याच वेळेस 262 रॅपिड तपासण्यात 21 जण पॉझिटीव्ह आढळले. या मुळे बारामतीत पुन्हा रुग्णसंख्या हळुहळू वाढत चालली आहे असे चित्र आहे. 

बारामतीत आजपर्यंत 4556 रुग्णांना कोरोना झाला होता, त्या पैकी 4241 रुग्ण बरे होऊन घरी गेलेले असून आजपर्यंत 123 रुग्णांचा बारामतीत मृत्यू झाला आहे. मधल्या काळात रुग्णसंख्या कमी होत गेली होती, आता पुन्हा आकडा तीसहून अधिक होऊ लागला आहे, त्यामुळे प्रशासनही सतर्क झाले आहे. 

नियमांचे तीन तेरा...
प्रत्येक दुकानात सॅनेटायझरची सुविधा, ग्राहकांचे नाव पत्ता, मोबाईल नंबर लिहून घेणे, नऊ वाजता दुकान बंद करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे या नियमांचे बारामतीत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तीन तेरा वाजले आहेत. अनेक ठिकाणी सर्रासपणे नियमांचे उल्लंघन होत असून गर्दीमुळे आता कोरोना इतिहासजमा झाल्याच्या थाटातच बारामतीकर वावरत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे. 

दुकानदारांसह ग्राहकांनीही मास्कचा वापर करणे, सॅनेटायझरचा वापर करणे तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळणे या बाबी गरजेच्या आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे अनिवार्य आहे. - डॉ. मनोज खोमणे, तालुका आरोग्य अधिकारी, बारामती. 

(संपादन : सागर डी. शेलार)